तिस्क–उसगाव येथे बेकायदा दारू तस्करीप्रकरणी आणखी तिघांना अटक

दीड कोटींचा ऐवज जप्त; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
तिस्क–उसगाव येथे बेकायदा दारू तस्करीप्रकरणी आणखी तिघांना अटक

पणजी : गुन्हा शाखेने तिस्क-उसगाव येथे छापा टाकून बेकायदा दारू तस्करीचा पर्दाफाश करून २ कंटेनर व दारू मिळून दीड कोटीचा ऐवज जप्त केला होता. या प्रकरणी आणखीन तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात कुरसिंग राजपूत (४२, राजस्थान), मुनाफ पिरसाभ शेख (४२, सावंतवाडी) आणि भरतसिंग राठोड (२५, राजस्थान) या तिघांचा समावेश आहे. यापूर्वी ४ जणांना अटक करण्यात आली होती.

आंतरराज्य टोळी फोंडा येथील तिस्क - उसगाव येथून दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्हा शाखेचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी असलेल्या गोदामांवर मंगळवार, ४ रोजी सकाळी छापा टाकला. पथकाने उदयपूर - राजस्थान येथील गोविंद सिंग राजपूत (२४), मुकेश आदिवासी (५०) व प्रकाश मीणा (२८) आणि अहमदाबाद - गुजरात येथील महेंद्र सिंग राजपूत (२८) या चार जणांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून पथकाने रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या ७५० एमलच्या १२ बाटल्या असलेले ५१० बॉक्स आणि इव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की १८० एमएलच्या ६,१२० बाटल्या जप्त केल्या. याशिवाय पथकाने दोन कंटेनर, तीन मोबाईल, एक प्रिंटर, तसेच वेगवेगळ्या राज्यातील नोंदणी असलेल्या २९ बनावट वाहन क्रमांक पट्टी जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या एेवजाची किंमत १.५ कोटी रुपये अाहे. मद्य तस्करी करण्यासाठी या बनावट वाहन क्रमांक प्लेट्स तयार केल्याचा दावा गुन्हा शाखेने केला. या प्रकरणी गुन्हा शाखेने गोदाम मालक तसेच मुख्य सूत्रधार राजेश यादव (उदयपूर - राजस्थान) याच्यासह वरील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याच दरम्यान गुन्हा शाखेने अधिक चौकशी करून कुरसिंग राजपूत, मुनाफ पिरसाभ शेख आणि भरतसिंग राठोड या तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांना फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

उपअधीक्षकांचा हस्तांतरण अर्ज

नवीन अटक झालेल्या तिघांचा यापूर्वी दाखल केलेल्या एका गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या गुन्ह्यात त्यांच्या सहभागासाठी उपअधीक्षक हिरू कवळेकर यांनी न्यायालयात हस्तांतरण अर्ज दाखल केला आहे.


हेही वाचा