
म्हापसा : बागा समुद्रकिनारी मुंबईतील एका युवतीवर अश्लील शेरेबाजी करून विनयभंग करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित अतेंद्र अजय सिंग (२३, रा. भरतपूर राजस्थान) या जॉन बीच शॅकच्या कर्मचाऱ्याला अटक केली. तर, इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.
ही घटना दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे २.०४ ते २.४० या दरम्यान घडली होती. याप्रकरणी सौम्या खन्ना हिने पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादींनी आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला होता. नंतर घरी गेल्यावर हा व्हिडिओ तिने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. अज्ञात तीन चार संशयितांनी तिला भारतीय की विदेशी आहेस? अशी विचारपूस करीत रात्रीचे किती पैसे घेतील, अशी अश्लील टिप्पणी केली. संशयितांनी वरील वेळेत तिच्याशी अनेकवेळा लगट करण्याचा प्रयत्न केला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बुधवारी रात्री पर्यटक पोलिसांनी संशयित अतेंद्र सिंग याला बागा समुद्रकिनारी पकडले व कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर गुरुवार, १३ रोजी पोलिसांनी युवतीची तक्रार नोंद करून घेतली.
भारतीय न्याय संहितेच्या ७५, ७८ व ७९ कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा नोंदवून संशयित अतेंद्र सिंग याला अटक केली. तर इतर अज्ञात संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.