तीन कोटींच्या फसवणूकप्रकरणी १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून घातला होता गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th November, 11:11 pm
तीन कोटींच्या फसवणूकप्रकरणी १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

पणजी : राज्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून सुमारे ३ कोटींहून जास्त रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) युदिवो प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कृष्ण कुमार उर्फ विजय कुमार जैस्वाल, त्यांची पत्नी रश्मी जैस्वाल, सुभाष चंद्रा व ९ एजंटांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) गुंतवणूकदारांच्या ईमेलद्वारे आलेल्या तक्रारीवरून ८ जून २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, मे. युदिवो प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार जैस्वाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी फातोर्डा येथे कार्यालय उघडून गुंतवणूकदारांना तीन वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा व्याजाचे आमिष दाखवले. यात पहिली योजना ११ हजार गुंतवणूक केल्यानंतर सहा महिन्यानंतर २३,४०० रुपयांसह पुढील सात महिने २००० प्रती महिना देण्याचे आमिष देण्यात आले होते. दुसरी योजना १,२१,००० रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा महिन्यानंतर २,३४,००० रुपयांसह दरमहिना ९ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तिसरी योजना २८,५०० रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा महिन्यानंतर दरमहिना २ हजार रुपये, त्यानंतर १२, १८ व्या महिन्यात २० हजार रुपये देण्याचे व इतर वेगवेगळ्या योजनांद्वारे आमिष दाखविण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच त्यासाठी कंपनीने ९ एजंटची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही काळ गुंतवणूकदारांना वेळोवेळी ठरल्याप्रमाणे परतावा देण्यात आला. याच दरम्यान कंपनीने या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक करून कार्यालय बंद करून पळ काढला. कंपनीने फसवणूक केल्याचे समजल्यानंतर गुंतवणूकदारांनी ईमेलद्वारे विभागात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन विभागाचे पोलीस निरीक्षक राजाशद शेख यांनी राज्यातर्फे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन उपनिरीक्षक पराग पारेख यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार जैस्वाल, त्यांची पत्नी रश्मी जैस्वाल, सुभाष चंद्रा तसेच ९ एजंटांविरोधात भादंसंच्या, गोवा ठेवीदार व्याज संरक्षण कायद्याचे आणि बक्षीस, चिट आणि पैसा अभिसरण योजना (बंदी) कायद्याचे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विभागाने विजय कुमार जैस्वाल याच्यासह कंपनीचा प्रमोटर संशयित सुभाष चंद्रा याला अटक करून कारवाई केली. या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर ईओसीचे निरीक्षक राजाशद शेख यांनी विजयकुमार जैस्वाल, त्याची पत्नी आणि प्रमोटर सुभाष चंद्रा व ९ एजंटाविरोधात वरील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ईडीकडून दखल

या प्रकरणाची दखल घेऊन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली कारवाई करून न्यायालयात कंपनीचे संचालक विजयकुमार जैस्वाल, त्यांची पत्नी आणि प्रमोटर सुभाष चंद्रा याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 

हेही वाचा