पर्रा अपघात प्रकरण : दुचाकीस्वार भाऊ बहीण गंभीर जखमी

पर्रा येथे हिट अँड रन अपघातात सापडलेली दुचाकी.
म्हापसा : लिंगाभाट, पर्रा येथे ‘हिट अँड रन’ अपघातात रेंट अ कॅब थार जीप गाडीने दुचाकीला जोरदार ठोकर दिल्याने रेवोडा-बार्देश येथील निकिता चव्हाण (२१) व नरेंद्र चव्हाण (१३) हे बहीण भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जीप चालक करण गुप्ता हा राजस्थानमध्ये पसार झाला असून त्याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस म्हापसा पोलिसांनी बजावली आहे.
हा अपघात सोमवारी १७ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घडला होता. जखमी निकिता ही बागा कळंगुट येथे कामावर जात होती. तर नरेंद्र हा तिचा लहान भाऊ शाळेला जात होता. कळंगुटहून म्हापशाच्या दिशेने भरधाव येणाऱ्या रेंट अ कॅब थार जीप (जीए ०३ व्ही ३०३३) ची जोरदार धडक विरुद्ध दिशेने जाणाऱ्या अॅक्टिवा दुचाकीला बसली. यात दुचाकीवरील दोघेही उसळून रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर संशयित जीप चालकाने जखमींना वैद्यकीय मदत पुरविण्याऐवजी घटनास्थळावरून थार गाडीसह पळ काढला. नंतर लोकांनी जखमींना रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात व त्यानंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले. दोघाही जखमींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
संशयित जीप चालकाने अपघातग्रस्त गाडी ही कळंगुट येथून एका रेंट अ कॅब आस्थापनाकडून भाड्याने घेतली होती. सदर आस्थापनाच्या मालकाकडून पोलिसांनी संशयिताशी संपर्क साधला व त्याला पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
पोलिसांनी हे प्रकरण हिट अँड रन अपघात म्हणून नोंदवले आहे. अपघाताचा पंचनामा पोलीस हवालदार नीलेश घाडी यांनी केला. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांमया मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मोपा विमानतळावर जीप सोडून संशयित पसार
अपघातानंतर पळून गेलेली जीप मोपा विमानतळाजवळील रस्त्याच्या कडेला आढळून आली. पोलिसांनी ही जीप तत्काळ जप्त केली आहे. संशयित चालक करण गुप्ता हा आपल्या इतर सहकाऱ्यांसह थार जीप गाडी मोपा विमानतळ पार्किंगस्थळी पार्क करून विमानमार्गे थेट राजस्थानमध्ये रवाना झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.