गोवा : पत्रकारिता पुरस्कारांवर ‘गोवन वार्ता’, ‘भांगरभूंय’, ‘दी गोवन’ची छाप

‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार प्रदान

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : पत्रकारिता पुरस्कारांवर ‘गोवन वार्ता’, ‘भांगरभूंय’, ‘दी गोवन’ची छाप

पणजी : राष्ट्रीय पत्रकार दिनाचे (National Press Day) औचित्य साधून गोवा शासनाच्या माहिती व प्रसिद्धी खात्याचे २०२४-२५ या वर्षासाठीचे राज्य पत्रकारिता पुरस्कार (Goa state journalist awards) सोमवारी प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये ‘गोवन वार्ता’, ‘दी गोवन’ आणि ‘भांगरभूंय’ या वर्तमानपत्रांची छाप पहायला मिळाली.


‘भांगरभूंय’ या कोकणी वर्तमानपत्राचे पत्रकार समीप नार्वेकर (Sameep Narvekar) आणि ‘दी गोवन’च्या पत्रकार विभा वर्मा (Vibha Verma) यांना उत्कृष्ट बातमीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोघांनाही २५ हजार रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘भांगभूंय’चे उपसंपादक अतुल पंडित (Atul Pandit) यांचा सत्कार करण्यात आला.




माहिती व प्रसिद्धी खात्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नारायण पिसुर्लेकर (Narayan Narayan Pissurlekar) (दी गोवन) यांनी चौथे स्थान पटकावले. त्यांचाही सत्कार करण्यात आला.


‘गोवन वार्ता’, ‘दी गोवन’च्या संपादकांचा सत्कार
‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर (Pandurang Gaonkar) यांना यंदाचा उत्कृष्ट संपादक पुरस्कार प्रदान करण्यात आले. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘दी गोवन’चे संपादक ज्योएल अफान्सो (Joel Alphonso) यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.


पत्रकारांनी राज्याची प्रतिमा जपावी : मुख्यमंत्री
पत्रकारांनी चुकीच्या गोष्टींवर नक्कीच लेखन करावे. त्याचबरोबर गोवा राज्याची प्रतिमा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. पत्रकारांसह सर्वांनीच राज्याची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केले.
सोमवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे संचालक दीपक बांदेकर, सचिव एस. एस. गिल, ‘गुज’चे अध्यक्ष राजतिलक नाईक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. हा स्तंभ मजबूत करण्याचे काम पत्रकारांचे आहे. सध्या सत्य समाजासमोर आणणे ही काळाची गरज आहे. सत्य समोर आले नाही तर खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मला स्वतःला यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे माध्यमांनी सत्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. माध्यमांनी बातमी देताना खरे काय, खोटे काय हे पडताळून मग बातमी द्यावी. दोन्ही बाजू तपासून बातमी करावी. सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर लिहिणे हा पत्रकारांचा अधिकारच आहे.
मागील सहा वर्षे राज्य सरकारने पत्रकारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. ईव्ही बाईक योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉप व कॅमेरा योजना देखील सुरू आहे. निवृत्ती वेतन योजनेत देखील वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. डिजिटल माध्यमांच्या नोंदणी प्रक्रियेबद्दल पत्रकार संघटनांनी माहिती आणि प्रसारण खात्याला सूचना कराव्यात. सरकार सदैव पत्रकार संघटनांसोबत राहील. महिला आधारित विकास ही देखील सध्याच्या काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ॲलेक्स फर्नांडिस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान


यावेळी कार्टुनिस्ट ॲलेक्स फर्नांडिस यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकार ज्योएल अफान्सो, नंदेश कांबळी, अतुल पंडित, बबन भगत, जय नाईक यांचा देखील सन्मान करण्यात आला. समीप नार्वेकर, विभा वर्मा यांच्यासह अजय बुवा, रणदीप कौर, मार्कुस मोर्गुल्याव, गौरी मळकर्णेकर, राजतिलक नाईक, ख्रिस्टिन माचाडो यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.       

हेही वाचा