पर्रा येथे भरधाव थारची दुचाकीला धडक; भावंडे गंभीर, चालक मोपाच्या दिशेने फरार

अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ; जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवले

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
47 mins ago
पर्रा येथे भरधाव थारची दुचाकीला धडक; भावंडे गंभीर, चालक मोपाच्या दिशेने फरार

म्हापसा: पर्रा येथे सोमवारी भरधाव वेगातील एका काळ्या थारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रेवोड्याचे निकिता (२१) व नरेंद्र (१३) हे भाऊ बहीण जखमी झाले असून, अपघातानंतर कार चालक मोपा विमानतळाच्या दिशेने पळून गेला.

धडकेमुळे दोन्ही भावंडे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेली. त्यांना पायांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने त्यांना पुढील विशेष उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर कारचालकाने थांबण्याची तसदी न घेता, थेट मोपाच्या दिशेने वेगाने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, फरार चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

पर्वरी येथे 'रेंट-ए-कार' आणि टॅक्सीची टक्कर

दरम्यान, पर्वरी येथेही आज सकाळी एका 'रेंट-ए-कार' आणि पर्यटक टॅक्सीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जोरदार धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. 

हेही वाचा