वेश्याव्यवसायातून प. बंगालच्या दोन युवतींची सुटका, दोघांना अटक

काणका-म्हापसा येथील गेस्ट हाऊसवर गुन्हा शाखेची धडक कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
वेश्याव्यवसायातून प. बंगालच्या दोन युवतींची सुटका, दोघांना अटक

पणजी: वेश्याव्यवसायाविरोधात कडक पावले उचलत गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने शनिवारी मध्यरात्रीनंतर काणका, म्हापसा येथील एका हॉटेलवर धडक कारवाई केली. 'एएचटीयू' (Anti-Human Trafficking Unit) या मानवी तस्करीविरोधी पथकासोबत मिळून राबवलेल्या या संयुक्त कारवाईत दोन पीडित युवतींची सुटका करण्यात आली, तर या मुलींना ही काम करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

'रिदम गेस्ट हाऊस'वर धाड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ ते रात्री ११ वाजेदरम्यान बार्देशमधील काणका येथील अब्बासवाडा येथे असलेल्या 'कोल्हापुरी मिसळ'च्या वरच्या मजल्यावरील रिदम गेस्ट हाऊस मध्ये ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित युवतींना ताब्यात घेतले. या दोघी मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी आहेत. डेव्हिड चेट्टियार (वय ५७, रा. रिदम गेस्ट हाऊस, ठाणे, महाराष्ट्र) आणि महेश कुंडलिक मोरे (वय ३९, रा. अब्बासवाडा, काणका, मूळ रा. कोल्हापूर, महाराष्ट्र) या दोन दलालांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली

या प्रकरणी गुन्हा शाखेच्या पोलीस स्थानकात आज रविवार १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:०४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला संशयितांविरुद्ध भा. न्या. संच्या कलम १४३, १४३(१)(३) सह ३(५) तसेच आयटीपीक्ट, १९५६ च्या कलम ३, ४, आणि ५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

हेही वाचा