पैसे परत मिळवण्यासाठी पूजाकडून सर्वांचा वापर : सरदेसाई

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
41 mins ago
पैसे परत मिळवण्यासाठी पूजाकडून सर्वांचा वापर : सरदेसाई

मडगाव: पैसे घेऊन नोकरी देण्याच्या प्रकरणात पात्र युवकांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्यामुळे पैसे देणारे आणि घेणारे दोन्ही दोषी आहेत. पैसे परत मिळवण्यासाठी पूजा नाईक पत्रकार, विरोधक आणि इतरांचा वापर करत आहे, असा थेट आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. तसेच, काही ठरावीक जणांचीच नावे पुढे येणे शंका उत्पन्न करते. हे सुदीन ढवळीकर यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरले जाणारे दबावतंत्र असू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एकंदरीत प्रकरणावर प्रश्नचिन्ह 

पैशांच्या बदल्यात नोकरी प्रकरणाविषयी बोलताना सरदेसाई म्हणाले, पूजा नाईक यांनी ६००पेक्षा जास्त जागांसाठी आणि सर्व खात्यांतील जागांसाठी पैसे घेतल्याचे म्हटले होते. मग आता निवडणुकांपूर्वीच केवळ एकाच मंत्र्याचे नाव पुढे केले जाते. पूजा ही नोकरीसाठी पैसे घेणारी गुन्हेगार आहे आणि ते पैसे परत मिळवण्यासाठी ती सर्वांचा वापर करत आहे.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांचा तपास सुरू असतानाही हे सर्व (आरोप) होत असल्यास, चौकशी हा केवळ 'फार्स' (ढोंग) असल्याचे दिसते. ज्या पोलिसांवर दक्षता खात्याकडे पाच तक्रारी आहेत, अशा पोलिसांकडून तपास सुरू असल्याने खरे काय ते कधीही समोर येणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या संपूर्ण प्रकरणी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

विरोधकांच्या युतीची हाक

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. काँग्रेस, आरजी (रिव्हॉल्युशनरी गोवन्स) आणि गोवा फॉरवर्ड यांनी एकत्र येत जिल्हा पंचायत निवडणुका लढवाव्यात, हा आमचा मुद्दा आहे. बिहारचा संदर्भ देत ते म्हणाले की, बिहारचा निकाल पाहता सर्रासपणे मतचोरी होऊ शकते, हे दिसून येते. त्यामुळे पहिल्यांदा एकत्र येण्याची गरज आहे, त्यानंतर एकजूट झाल्यानंतर काय होईल हा पुढील मुद्दा आहे. यासाठी दोन्ही पक्षांसोबत चर्चाही झालेली आहे, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

हेही वाचा