जीसीए धारगळ येथे उभारणार क्रिकेट मैदान

वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय : गोव्यात २० नवीन प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
जीसीए धारगळ येथे उभारणार क्रिकेट मैदान

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत येत्या तीन वर्षांमध्ये धारगळ किंवा म्हावळिंगे यापैकी एका जागेवर नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधण्यास सर्व सदस्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या दोन्हीपैकी धारगळला स्टेडियम बांधण्याकडे जीसीएचा कल असेल, अशी माहिती जीसीएचे अध्यक्ष महेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पर्वरी येथील जीसीएच्या सभागृहात रविवारी ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. नवीन कार्यकारिणी समितीची ही पहिलीच आमसभा असल्याने अध्यक्षांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले. या बैठकीत गोव्यातील क्रिकेटच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात २० नवीन प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात 'पिंक फोर्स' या नावाने खास मुलींसाठी ५ प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. यापूर्वी मागील समितीच्या वेळी १२ केंद्रे सुरू झाली होती, मात्र त्यापैकी केवळकेंद्रेच सक्रिय राहिली होती.

क्रिकेटमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नव्या कमिटीने १६ वर्षांखालील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी रणजी क्रिकेटपटू प्रीतम गांधी, तसेच मुलींच्या प्रशिक्षक म्हणून नेहा तन्वर यांची नियुक्ती केली आहे. या २० केंद्रातून निवडक खेळाडूंना जीसीएच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात प्रवेश देण्यात येईल. या शिबिरातून रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी नवीन खेळाडू तयार होण्याची अपेक्षा आहे. मागील कमिटीच्या काळात हिशोबात तफावत असल्याची शक्यता असल्याने, अकबर मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली साईश म्हांब्रे आणि प्रसाद फातर्फेकर यांची तपास समिती नेमण्यास आमसभेत मंजुरी देण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे अध्यक्ष महेश देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

जीपीएल’ स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा मानस

गेली आठ ते नऊ वर्षांपासून बंद असलेली गोवा प्रीमियर लीग (जीपीएल) स्पर्धा यंदापासून पुन्हा सुरू करण्याचा नवीन कमिटीचा मानस आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणाऱ्या खेळाडूंना जीपीएल लीगमध्ये खेळण्यासाठी मिळावे, यासाठी जीसीए प्रयत्नशील असेल.

हेही वाचा