साप्ताहिकी : गोव्यात आठवडाभर गुन्ह्यांचे सत्र; ‘पूजा नाईक’ प्रकरण पुन्हा चर्चेत!

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
15th November, 10:35 pm
साप्ताहिकी : गोव्यात आठवडाभर गुन्ह्यांचे सत्र; ‘पूजा नाईक’ प्रकरण पुन्हा चर्चेत!

पणजी : गोव्यात गेल्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्यात अपघातांपासून ते हाय-प्रोफाइल घोटाळ्यांपर्यंतच्या घडामोडींचा समावेश होता. अस्नोडा येथे कालव्यात कार पडून एका मित्राचा मृत्यू झाला, नोकरीसाठी आयएएस अधिकारी, अभियंत्याला पैसे दिल्याच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित पूजा नाईक ठाम, तर दाबोळीत स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश आदी घडामोडींचा घेतलेला संक्षिप्त आढावा.‍


रविवार
अस्नोडा येथे कालव्यात कार पडून एकाचा मृत्यू


रविवारची सहल दोन जीवलग मित्रांच्या जीवावर बेतली. कारमधून भटकंती करून परतताना कार कालव्यात कोसळून यातील एका ​मित्राचा मृत्यू झाला, तर दुसरा सुदैवाने बचावला. ही हृदयद्रावक घटना कैलासनगर-अस्नोडा येथे घडली. दीपेश मांद्रेकर (अस्नोडा) असे मृताचे नाव असून शिरगाव येथील रितेश शिरगावकर याचा जीव वाचला. कारमधून दोघेही आमठाणे भागातून अस्नोड्याच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला.

दाबोळीत स्पामधील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश
वास्को पोलिसांनी शनिवारी रात्री दाबोळी येथे स्पाच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान सहा महिलांची सुटका करण्यात आली. शनिवार ८ रोजी सायं. ७.५७ ते ९ रोजी पहाटे १२.४० दरम्यान दाबोळी येथील लोटस स्पा येथे छापा टाकण्यात आला. या जागेचा वापर वेश्या व्यवसायासाठी केला जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

सोमवार
घोगळ, मडगाव येथे ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर तोडले


घोगळ, मडगाव येथील चौगुले महाविद्यालयानजीकच्या कृष्णा प्लाझा येथील एस. व्ही. ज्वेलर्स हे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान रविवारी रात्री फोडण्यात आले. दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे असल्याचे दिसून आले. फातोर्डा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

आयएएस अधिकारी, अभियंत्याला पैसे
दिल्याच्या दाव्यावर पूजा नाईक ठाम


नोकरीसाठी पैसे देण्याच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित पूजा नाईक हिची गुन्हा शाखेने रविवारी चार तास चौकशी केली होती. त्यात तिने संबंधित आयएएस अधिकारी तसेच अभियंत्याला पैसे दिल्याचा दावा करून त्याचे नाव उघड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी पूजा नाईक हिची डिचोली पोलिसाकडून दोन तास चौकशी करण्यात आली.

१४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
करून गरोदर केल्याप्रकरणी बाप दोषी

वैद्यकीय अहवाल सकारात्मक आल्याचे निरीक्षण नोंदवून सासष्टी तालुक्यात २०१८ मध्ये स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने वडिलांला दोषी ठरविले आहे. बाल न्यायालय अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी आदेश दिला आहे.

मंगळवार
जप्त केलेला गांजा प्रयोगशाळेत सिद्ध न झाल्याने आरोपीची सुटका

न्यायालयात सादर केलेल्या दस्तावेजांनुसार, गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयितांकडून जप्त केलेली सामग्री आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेने तपासलेली वस्तू या एकमेकांपासून भिन्न असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, तपासलेली वस्तू अमली पदार्थ कायद्यानुसार ‘गांजा’च्या व्याख्येत बसत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. या आधारे मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी संशयित विकी यादव याची गांजा तस्करी प्रकरणातून सुटका करण्याचा आदेश दिला.

वीज खात्याच्या जमिनीची विक्री, संशयितावर गुन्हा
वेर्णा येथील वीज खात्याची जमीन स्वतःची असल्याचे सांगत ती गिरीश कुमार पिल्लई यांना २.४० कोटी रुपयांना विक्री केल्याप्रकरणी इडलीना मारिया डोरेस दा क्रुझ (रा. लोटली) यांच्याविरुद्ध फातोर्डा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अभियंता आशिष राजपूत यांनी फातोर्डा पोलिसात तक्रार नोंद केली आहे.

बुधवार
पूजा नाईक आरोपप्रकरणी नव्याने गुन्हा

नोकरीसाठी पैसे देण्याच्या घोटाळा प्रकरणी पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांवर गुन्हा शाखेने नव्याने गुन्हा नोंद केला आहे. संपूर्ण प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी होणार आहे. चौकशीनंतरच पोलीस किंवा मला भाष्य करणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

लैंगिक अत्याचारातून १७ वर्षीय युवती गर्भवती;
दोघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश


डिचोली तालुक्यात २०२४ मध्ये १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात २६ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचाराचा, तर पीडित मुलीच्या एका महिला नातेवाईकावर संशयितासोबत कट रचून अपहरणास साथ दिल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.

गुरुवार
मोहम्मद सुहैलसह चौघांविरोधात आरोपपत्र दाखल

हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४८६/६ मधील जमीन हडप प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली. एसआयटीने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, राॅयसन्स राॅड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ५६९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

नुवे येथे कंटेनरच्या धडकेत दोन म्हशी जखमी
नुवे येथील महामार्गावर रात्री मोठ्या कंटेनरच्या धडकेत दोन म्हशी जखमी झाल्या. यातील एक म्हैस ही गाभण असल्याचे दिसून आले. मायना कुडतरी पोलीस, बजरंग दल, डीएसपीसीए यांनी म्हशींना बाजूला घेत पाणी पाजले व त्यानंतर सांभाळण्यासाठी ध्यान फाऊंडेशनच्या ताब्यात दिले.
संत्रांत कुठ्ठाळीतील अपघातात दोन स्कूटरस्वार
संत्रांत कुठ्ठाळीच्या वालंकिणी चॅपेलजवळ बुधवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान झालेल्या अपघातात दोन स्कूटरस्वार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. वेर्णा पोलिसांनी प्रदीप पिल्लाई (कुठ्ठाळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‍शुक्रवार
मिरामार येथे सिल‌िंडरमधून गॅस चोरी


मिरामार येथील एका वसाहतीत ट्रकमध्ये भारत पेट्रोलियमच्या गॅस सिल‌िंडरमधून गॅस चोरी करताना दोघांना स्थानिकांनी पकडले. त्यानंतर बिंग फुटल्याचे समजताच वाहन व सर्व साहित्य टाकून दोघेही तेथून पळाले. हॉटेलमध्ये पुरवठा केल्या जात असलेल्या १८०० रुपयांच्या सिलिंडरमधून गॅस चोरी केली जात होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घराला आग लागून वांते येथे १० लाख रुपयांचे नुकसान
वांते सत्तरी येथील अंजनी तिवरेकर यांच्या घराला शुक्रवारी दुपारी आग लागून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेत सोन्याचे दागिने व रोकड जळून खाक झाली. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ भेट देऊन घराला लागलेली आग विझवली.

शनिवार
मनीषा केतकर खूनप्रकरण; पती केतकरची जन्मठेपेची शिक्षा रद्द

लाडफे, डिचोली येथे २०१३ मध्ये झालेल्या पत्नी मनीषा केतकर (वय ४०) हिच्या खून प्रकरणी दोषी ठरवत पती मनोहर लक्ष्मण केतकर (रा. धाटवाडी, कसई-दोडामार्ग) याला म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे.
.....
सांताक्रूझमध्ये फायबर केबलमुळे अपघात
सांताक्रूझ येथे रस्त्यावरील असुरक्षित फायबर ऑप्टिक केबलमध्ये मोटारसायकल अडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला आणि काही ठिकाणी लोंबकळत असलेल्या फायबर ऑप्टिक केबलचा गुंता मोटारसायकलच्या चाकात अडकला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटारसायकलस्वार खाली कोसळले. जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लक्षवेधी
* बेळ्ळिकेरी येथील बेकायदेशीर लोहखनिज निर्यातीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कर्नाटक राज्यातील कारवारचे आमदार सतीश कृष्णा सैल आणि इतरांशी संबंधित तब्बल २१ कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
* झरी-झुआरीनगर येथे रस्त्यावर बॅरिकेड्स ठेवून नागरिकांना अडवल्याच्या वादातून झालेल्या मारामारीप्रकरणी वेर्णा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
* लोटली येथील चौगुले कंपनीच्या शिप बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या कामगाराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. मूळ उत्तरप्रदेश येथील जियालाल मिसाळ (३५) हा कामगार चौगुले कंपनीतील शिप बिल्डिंग भागात काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला.
* कुंकळ्ळी परिसरातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
* नावेलीतील रातवाडो येथील ट्राव्हासो यांच्या मालकीची बुलेट चोराने पळवली. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी चोराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
* पणजी- फोंडा राष्ट्रीय महामार्गावर मंगेशी येथील धोकादायक क्रॉसवर संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या ड्रायव्हरसह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले.

हेही वाचा