
पणजी : गोव्यातील (Goa) वाढते अपघात व त्यात जाणारे बळी चिंताजनक आहेत. अपघात कसे रोखावेत हा प्रश्न प्रशासनाला पडत असतो. त्यादृष्टीने विविध उपाययोजनाही हाती घेतल्या जातात. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची (North Goa District Road Safety Committee) बैठक झाली.
त्यात अपुरे असलेले रस्त्यांचे काम पूर्ण करणे, राष्ट्रीय हमरस्त्यावर (National Highway) गती नियंत्रण, दिशा फलक व सुरक्षा फलक लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी : १ गुरुदास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. त्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या जीवघेण्या भीषण अपघातांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
त्यात बांबोळी येथे उतरणीवर टॅंकर व कारमध्ये झालेल्या अपघाताचा समावेश होता. टॅंकर चालकाने आपली लेन सोडून विरुद्ध बाजूला जाऊन ‘रेंट अ कॅब’ कारला धडक दिली होती. त्यात सॅपेक टाक्रॉ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र सिंग व अंकीत कुमार बलियान (खेळाडू) हे दोघे ठार झाले होते.
याठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. अपघातानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वाहतूक अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी यांनी या रस्त्याची पाहणी केली होती.
राज्यातील हमरस्ते व प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडून बसणारी भटकी गुरे, ही समस्या नेमकी कशी हाताळावी; यासंदर्भात चर्चा झाली. गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यावर बैठकीतील चर्चेत भर देण्यात आला.
गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टीन्स या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, करमळी ते थिवीपर्यंत असलेल्या पर्यायी रस्त्यांची पाहणी करून या रस्त्यांवर सुरक्षेसंदर्भात व वाहतुकीचा ओघ सुरळीत चालावा, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
दारूच्या नशेत वाहने हाकणे, नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणे, गोव्यातील समुद्र किनारपट्टीत बेकायदेशीररित्या वाहने हाकणे इत्यादी प्रकारांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रस्ता अपघातात सापडलेल्यांना मिळणारे अर्थसहाय्य योजनेसंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. पादचारी, लोकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या ‘झेब्रा क्रॉसिंग’ची पाहणी करून आढावा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.