२०१९ च्या मेगा भरतीदरम्यान एका आयएएस तसेच एका पीडब्ल्यूडी अभियंत्याला १७.६८ कोटी दिल्याचा दावा पूजा नाईकने परवाच प्रसारमाध्यमांसमोर केला होता.

पणजी : पैसे घेऊन नोकरी देण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिच्या आरोपांमुळे गोव्याच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. नोकरीसाठी पैसे घेतल्याचा खोटा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी पूजा नाईकला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ७२ तासांत लिखित स्वरूपात तसेच प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा फौजदारी कारवाई करू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
आयएएस अधिकारी आणि पीडब्ल्यूडी अभियंत्याला १७.६८ कोटी?
दरम्यान, परवा दिवशी 'आप'चे गोव्यातील निमंत्रक अमित पालेकर यांच्यासह पूजा नाईकने मोठा गौप्यस्फोट केला होता. तिने आरोप केला की, २०१९ च्या मेगा भरतीदरम्यान ६१३ उमेदवारांकडून सरकारी नोकरीसाठी घेतलेले १७.६८ कोटी एक आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याला देण्यात आले होते. हे काम एका वरिष्ठ मंत्र्याच्या इशाऱ्यावर करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांकडे असल्याचा गंभीर दावा पूजा नाईकने केला.
पूजा नाईकने सांगितले की, एका प्रादेशिक पक्षाच्या कार्यालयात नोकरी करत असताना आपण पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या. पोलिसांना दिलेल्या जबानीत आपण त्या दोन अधिकाऱ्यांची नावे सांगितली होती, मंत्र्याचे नाव घेतले नव्हते. हे पैसे पर्वरी येथील फ्लॅटमध्ये दिले होते. आता पोलीस तिथे फ्लॅट नाही तर शिक्षण संस्था असल्याचे सांगत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचा त्यात कसलाही हात नसल्याचे पूजाने स्पष्ट केले.
१७ कोटी परत करण्याची मागणी
पूजा नाईकच्या म्हणण्यानुसार, तिने यापूर्वी ८० हून अधिक जणांना पैसे घेऊन नोकरी दिली आहे, पण २०१९ ते २०२२ दरम्यान झालेल्या मेगा नोकरी भरतीमध्ये पैसे घेतलेल्या एकाही उमेदवाराला नोकरी मिळाली नाही. माझेच १७ कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत, बाकीच्यांचे किती अडकले आहेत हे माहीत नाही, असे तिने स्पष्ट केले. तसेच, पैसे दिल्याचा व्हिडिओ आणि इतर पुरावे असलेला तिचा एक मोबाईल डिचोली पोलिसांनी यापूर्वीच जप्त केला आहे असेही ती म्हणाली.
सुदिन ढवळीकर आणि मगोपकडून आरोपांचे खंडन
त्याच दिवशी सायंकाळी पत्रकारांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना पूजाने केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. नोकरी विक्री प्रकरणात क्राइम ब्रँचने आधी चौकशी पूर्ण करू द्यावी, नंतरच मी बोलेन. मी कसा आहे हे सर्वांना ठाऊक आहे आणि कोणीही माझे नाव बदनाम करू शकणार नाही. पूजा नाईक माझ्याकडे कामाला नव्हतीच. गोमंतकीय जनता, पोलीस या सर्वांना मी कसा आहे हे ठाऊक आहे. मी नंतर भाष्य करीन असे ते यावेळी म्हणाले.
तसेच मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही पूजा नाईकचे आरोप फेटाळले. पूजा नाईक ही मगोपच्या कार्यालयात कधीच कामाला नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तिच्या विधानांमध्ये विसंगती असून, मगोपला लक्ष्य करण्यासाठी तिला कोणीतरी शिकवून पाठवले आहे. क्राइम ब्रँचची चौकशी पुढील आठ दिवसांत पूर्ण होईल आणि त्यानंतर सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.