बालदिनीच १३ वर्षीय काजलचा दुर्दैवी अंत; पालकांमध्ये संतापाची लाट

पालघर: शिक्षकांनी दिलेल्या अमानुष शिक्षेमुळे वसई परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. वसई पूर्व सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या काजल उर्फ अंशिका गौड (वय १३) या विद्यार्थिनीला शाळेत केवळ दहा मिनिटे उशीर झाल्याने शिक्षिकेने १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा तिच्या जीवावर बेतली असून, बालदिनीच (१४ नोव्हेंबर) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
काय घडले नेमके?
८ नोव्हेंबर रोजी काजल उर्फ अंशिका गौड ही विद्यार्थीनी शाळेत काही मिनिटे उशिरा आली. उशीर झाल्याने शिक्षिकेने तिला पाठीवर दप्तरासह १०० उठाबशा काढण्याची कठोर शिक्षा सुनावली. अनेक विद्यार्थ्यांना दप्तर पाठीवर ठेवून उठाबशा काढायला लावण्यात आल्या होत्या, त्यात काजळ देखील होती. घाबरलेल्या काजलने सर्व १०० उठाबशा पूर्ण केल्या. घरी परतल्यानंतर तिला अंगदुखीचा आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. कुटुंबियांनी तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान १४ नोव्हेंबरच्या रात्री तिची प्राणज्योत मालवली.

शिक्षण कायद्याचे उल्लंघन
या घटनेमुळे शाळेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा करणे हा गुन्हा असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. वसईचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा करणे हा गुन्हा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाईल असे ते म्हणाले.

पोलीस चौकशी सुरू
या प्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. वालीव पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप घुगे म्हणाले, अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी मुलीचा मृत्यू उठाबशा काढल्याने झाल्याचे दिसून येते. डॉक्टरांची कागदपत्रे आणि तक्रार आल्यावर पुढील प्रक्रिया व चौकशी केली जाईल.

पालक आणि मनसेचा संताप
काजलच्या कुटुंबियांनी शाळा प्रशासनाने जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि मनसेसह विविध राजकीय संघटनांनी शाळा प्रशासनासमोर तीव्र संताप व्यक्त केला. दोषी शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. विशेष म्हणजे, काही माध्यमांच्या वृत्तानुसार या शाळेला कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याचेही समोर आले आहे. शिस्तीच्या अतिरेकामुळे एका चिमुकलीचा जीव गेल्याने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणावरील 'शारीरिक शिक्षेचे' ग्रहण अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
