
बंगळूरु: जगभरात 'वृक्षमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्त्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी १४ नोव्हेंबर २०२५ निधन झाले. वयाच्या ११४ व्या वर्षी बेंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.
'सालूमरदा' नावाची कहाणी
३० जून १९११ रोजी जन्मलेल्या थिमक्का यांनी आपल्या अथक परिश्रम आणि वृक्षारोपण मोहिमेमुळे 'सालूमरदा' ही उपाधी मिळवली. त्यांनी कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील हुलिकल ते कुदूर या ४.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ३८५ वडाचे वृक्ष लावले आणि त्यांचे संगोपन स्वतःची मुले समजून केले. औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी निसर्गाशी असलेले अतूट नाते जपले आणि आपल्या आयुष्यात ८,००० हून अधिक झाडे लावली व वाढवली.
दुःखावर मात
थिमक्का आणि त्यांचे पती निःसंतान होते. या संतानहीन आयुष्यातील रिकामेपणा दूर करण्यासाठी त्यांनी झाडांनाच आपल्या लेकरांप्रमाणे वाढवण्याचा निर्णय घेतला. उन्हात, पावसात, पाण्याच्या कमतरतेतही त्यांनी प्रत्येक झाडाची तळमळीने काळजी घेतली. त्यांच्या या निस्वार्थ हरित क्रांतीमुळे देशातील पर्यावरण संवर्धनाच्या चळवळींना नवी दिशा मिळाली आणि त्यांचे कार्य जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरले.
पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्यभर निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या थिमक्का यांना त्यांच्या या कार्यासाठी अनेक मानाचे सन्मान लाभले. त्यांना पद्मश्री (२०१९) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याशिवाय, त्यांना हम्पी विद्यापीठाचा नाडोजा पुरस्कार (२०१०), नॅशनल सिटिझन अवॉर्ड (१९९५) आणि इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार (१९९७) यांसह अनेक राष्ट्रीय गौरव प्राप्त झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थिमक्का यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी 'X' (ट्विटर) वर लिहिले, वृक्षमाता साळूमरदा तिम्मक्का यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले. त्यांनी हजारो झाडे लावली, त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम दिले आणि आयुष्यभर पर्यावरण संवर्धनासाठी वाहिले. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले आहे, परंतु निसर्गासाठीचे त्यांचे प्रेम त्यांना अमर करून गेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांस माझ्या संवेदना. पर्यावरण संवर्धनाला आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.