जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलिस ठाण्यात साठवलेल्या स्फोटकांचा स्फोट : ९ जणांचा मृत्यू

२५ हून अधिक जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलिस ठाण्यात साठवलेल्या स्फोटकांचा स्फोट : ९ जणांचा मृत्यू

श्रीनगर : फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल (Faridabad terror module case ) प्रकरणासंदर्भात जप्त केलेली स्फोटके हाताळताना श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात (Srinagar's Nowgam Police Station ) मोठा स्फोट ( massive explosion ) झाला. या स्फोटात किमान ९ जण ठार झाले तर २५ हून अधिक जखमी झाले. अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणासंदर्भात अलीकडेच जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून अधिकारी नमुने काढत असताना हा स्फोट झाला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

 परिसरातील सीसीटीव्ही  क्लिपमध्ये पोलीस स्टेशनच्या इमारतीत स्फोट झाल्याचे दिसून येते. स्फोटानंतर हवेत दाट धूर पसरला. 

सूत्रांनुसार, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून काही जण अजूनही बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. ढिगाऱ्यात अडकलेल्यांचा शोध घेणे सुरू आहे. घटनास्थळापासून ३०० फूट अंतरावर मृतदेहांचे अवयव सापडले. त्यामुळे स्फोटाची तीव्रता लक्षात येत असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. 

गोळीबार किंवा दहशतवादी हल्ला

पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोन दिशेने तपास सुरू आहे.   दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीलिंग दरम्यान अमोनियम नायट्रेट पेटून स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जाते.  दहशतवादी हल्ला असण्याची दुसरी शक्यता वर्तवली जात आहे. 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,  पोलीस आणि फॉरेन्सिक पथके फरिदाबादहून आणलेल्या स्फोटक पदार्थांची हाताळणी करत असताना हा स्फोट झाला. दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातून जप्त केलेल्या ३५० किलोग्रॅमच्या साठ्यापैकी बराचसा भाग पोलिस स्टेशनमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी प्राथमिक एफआयआर नोंदवण्यात आला होता. जप्त केलेल्या रसायनांपैकी काही पोलीस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. परंतु मोठा भाग स्टेशनमध्येच राहिला होता. मृतदेह श्रीनगरमधील पोलीस नियंत्रण कक्षात नेण्यात आले आहेत.

 कंपाऊंडमध्ये सापडलेली जप्त केलेली कार आयईडीने भरलेली होती का व ज्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दिशेने तपास केला जात आहे. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या पीएएफएफ या छाया संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

सुरक्षा कडक करण्यात आली 

परिसर सील करण्यात आल्यानंतर सुरक्षा दलांनी स्निफर कुत्र्यांसह परिसराची तपासणी केली. श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी स्थानिक रुग्णालयात जखमींची भेट घेतली.

 आतापर्यंत अटक केलेल्या आठ जणांपैकी एक असलेल्या फरिदाबादमधील डॉ. मुझ्झमिल शकील गनी यांच्या भाड्याच्या घरात ३५० किलोचा साठा मूळतः जप्त करण्यात आला होता.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांनी शुक्रवारी संध्याकाळी संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा आढावा घेतला. कारण या आठवड्याच्या सुरुवातीला लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटानंतर एजन्सींनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. या स्फोटात  किमान १३ लोकांचा मृत्यू झाला होता.

नौगाम स्फोटामुळे ही दोन्ही प्रकरणे म्हणजे मोठ्या कटाचा भाग आहे का? याचा अधिक सखोलपणे तपास केला जात आहे. 

दहशतवाद्यांना अटक 

ऑक्टोबरच्या मध्यात नौगाममध्ये धमकीचे पोस्टर्स दिसल्यानंतर तपास सुरू झाला. सीसीटीव्ही विश्लेषणामुळे तीन स्थानिक रहिवासी, आरिफ निसार दार उर्फ ​​साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार उर्फ ​​शाहिद यांना अटक करण्यात आली होती.  त्यांच्यावर यापूर्वी दगडफेकीच्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. त्यांच्या चौकशीतून मौलवी इरफान अहमदची भूमिका उघड झाली. तो माजी पॅरामेडिकमधून धर्मोपदेशक बनला होता आणि अनेक डॉक्टरांना कट्टरपंथी बनवण्याचा आणि पोस्टर्स पुरवत असल्याचे पुढे आले. एकूण या प्रकणाचा सखोल तपास सुरू असून, त्यात अनेक डॉक्टरांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. अटक केलेल्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. 


हेही वाचा