बिहारमध्ये ‘एनडीए’च्या महात्सुनामीत महागठबंधन उध्वस्थ

२०२ जागांसह विक्रमी विजय : भाजप ठरला सर्वांत मोठा पक्ष : काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November, 05:39 pm
बिहारमध्ये ‘एनडीए’च्या महात्सुनामीत महागठबंधन उध्वस्थ

पाटणा : बिहार विधानसभा २०२५ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ‘त्सुनामी’सारखा विक्रमी विजय मिळवला. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या कल व निकालांनुसार, २४३ जागांच्या विधानसभेत ‘एनडीए’ने तब्बल २०२ जागांवर विजय मिळवला (किंवा निर्णायक आघाडी घेतली) आहे. हा आकडा बहुमताच्या १२२ च्या जादूई आकड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

या ‘एनडीए’च्या वादळात, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालीलमहागठबंधन’ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहे. ‘महागठबंधन’ला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’सह इतर पक्षांना मिळून ७ जागा मिळाल्या आहेत.

या निकालाचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. बिहारच्या इतिहासातील काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. संपूर्ण राज्यात काँग्रेसला केवळ १ जागा मिळवताना दिसत आहे. ‘महागठबंधन’च्या या दारूण आणि लाजिरवाण्या पराभवामुळे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या गोटात अक्षरशः स्मशानशांतता पसरली आहे.

‘डबल इंजिन’वर जनतेचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, भाजपचे तळागाळातील संघटन आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ‘सुशासन बाबू’ हा चेहरा, या ‘ट्रिपल इंजिन’ सरकारच्या फॉर्म्युल्यावर बिहारच्या जनतेने सढळ हाताने विश्वास दाखवला आहे. ‘एनडीए’च्या नेत्यांनी हा ‘ऐतिहासिक विजय’ म्हणजे विकास, कायदा-सुव्यवस्था आणि राष्ट्रवादाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

तेजस्वी यादव ठरले निष्प्रभ

२०२० च्या निवडणुकीत ‘एनडीए’ला कडवी झुंज देणारे तेजस्वी यादव या निवडणुकीत पूर्णपणे निष्प्रभ ठरले. १० लाख नोकऱ्यांचा मुद्दा घेऊन त्यांनी प्रचार सुरू केला होता, मात्र ‘एनडीए’च्या विकासाच्या अजेंड्यापुढे आणि मोदींच्या लोकप्रियतेपुढे त्यांचा एकही मुद्दा टिकू शकला नाही. आरजेडीच्याजंगलराज’च्या जुन्या आठवणींनी जनतेला पुन्हा एकदा ‘एनडीए’कडे वळण्यास भाग पाडले, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पराभवाचे खापर काँग्रेसवर

महागठबंधन’च्या पराभवाचे मुख्य खापर आता काँग्रेसवर फुटत आहे. काँग्रेसने जास्त जागांचा हट्ट धरला, पण त्या जागांवर लढण्यासाठी त्यांच्याकडे ना संघटन होते, ना उमेदवार. परिणामी, ‘एनडीए’ने या जागांवर एकतर्फी विजय मिळवला. काँग्रेसची ही ‘१’ जागा पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

प्रशांत किशोर यांचा प्रयोग फसला

बिहारमध्ये ‘बदल’ घडवण्याची घोषणा करत मैदानात उतरलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा ‘जन सुराज’ प्रयोगही पूर्णपणे फसला आहे. ‘इतर’ पक्षांना मिळालेल्या ७ जागांमध्येच त्यांच्या पक्षाचा समावेश आहे. त्यांनी काही ठिकाणी ‘महागठबंधन’ची मते तोडली, पण त्याचा ‘एनडीए’लाच फायदा झाला. एकतर्फी त्सुनामीत त्यांचा ‘फॅक्टर’ कुठेही दिसला नाही.

बिहारच्या जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही जनतेचा विश्वास जिंकण्यात कमी पडलो. हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. आम्ही या पराभवाचे सखोल आत्मचिंतन करू. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील. - तेजस्वी यादव, नेते, आरजेडी

बिहारचा निकाल आमच्यासाठी अत्यंत निराशाजनक आणि धक्कादायक आहे. बिहारच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या पराभवाची आम्ही जबाबदारी स्वीकारतो. आम्ही जनतेचे मन जिंकू शकलो नाही. आम्ही संघटनात्मक पातळीवर सखोल विचार करू. विजयी ‘एनडीए’चे आम्ही अभिनंदन करतो.- राहुल गांधी, काँग्रेस

बिहारच्या जनतेला बदल हवा होता, पण त्यांनी तो आमच्या स्वरूपात स्वीकारला नाही. ‘जन सुराज’ची ही केवळ सुरुवात आहे. आम्ही पराभूत झालो नाही, आम्ही शिकलो आहोत. बिहारच्या पुनर्निर्माणाचा आमचा अजेंडा घेऊन आम्ही पुढील ५ वर्षे जनतेमध्ये काम करत राहू.- प्रशांत किशोर, प्रमुख, जन सुराज

हा जनादेश नसून ‘मॅनेजमेंट’चा निकाल आहे. ‘महागठबंधन’च्या मतांमध्ये एवढी मोठी घसरण होणे हे संशयास्पद आहे. हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे. आमचा वैचारिक लढा आणि संघर्ष रस्त्यावर सुरूच राहील.- दीपांकर भट्टाचार्य, सरचिटणीस, सीपीआय (एमएल)

निकालातील १० महत्त्वाचे मुद्दे...

१) ‘एनडीएश्रला २४३ पैकी २०७ जागा. हा बिहारच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे.

२) ‘महागठबंधन’चा (आरजेडी + काँग्रेस + डावे) केवळ २९ जागांवर खुर्दा.

३) काँग्रेसला बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच केवळ ‘१’ जागा मिळाली.

४) मोदी-नितीश यांच्या ‘डबल इंजिन’ सरकारच्या कामावर जनतेने भरभरून विश्वास दाखवला.

५) तेजस्वी यादव यांचा करिष्मा किंवा ‘नोकरी’चा मुद्दा या निवडणुकीत अजिबात चालला नाही.

६) ‘जन सुराज’चा ‘बदलाव’ फॅक्टर पूर्णपणे अयशस्वी ठरला.

७) ही निवडणूक ‘कांटे की टक्कर’ नसून, सुरुवातीपासूनच ‘एकतर्फी’ ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

८) ‘एनडीए’च्या कायदा-सुव्यवस्था आणि मोफत रेशन योजनांना महिला मतदारांनी भरभरून मतदान केल्याचे दिसते.

९) या विक्रमी विजयामुळे ‘एनडीए’ आघाडीत भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे.

१०) ‘महागठबंधन’ २९ जागांवर आल्यामुळे विधानसभेत एक मजबूत विरोधी पक्षही शिल्लक राहणार नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा