पश्चिम घाटात 'अम्लीसेप्स वायव्य' या नव्या माशाचा शोध

ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन व स्वतंत्र संशोधकांनी गोवा आणि महाराष्ट्रातील पश्चिम घाटात 'अम्लीसेप्स वायव्य' या कॅटफिशच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. येथील संवेदनशील जल-अधिवासांच्या संरक्षणाची गरज या शोधामुळे अधोरेखित झाली आहे.

Story: साद निसर्गाची |
14th March, 11:44 pm
पश्चिम घाटात 'अम्लीसेप्स वायव्य'  या नव्या माशाचा शोध

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन व ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अभिषेक शिर्के यांनी हा शोध लावला. नव्याने शोध लावलेल्या या माशाचा समावेश 'अम्लीसेप्स' (Amblyceps) कुळामध्ये केला आहे. पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अधिवास असणाऱ्या या माशाचे नामकरण ‘अम्लीसेप्स वायव्य’ (Amblyceps vayavy) असे करण्यात आले आहे. कोकणी आणि मराठी भाषेत वायव्याचा अर्थ उत्तर-पश्चिम असा होतो, जो या प्रजातीच्या उत्तर-पश्चिम घाटातील वास्तव्याचा संदर्भ दर्शवितो. 'अम्लीसेप्स' या वंशाच्या आढळाची ही पश्चिम घाटामध्ये झालेली आतापर्यंतची सर्वांत उत्तरेकडील नोंद आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या अभिषेक शिर्के यांच्या म्हणण्यानुसार हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण आढळते, जे या माशाला लपण्यासाठी व अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास (microhabitat) उपलब्ध करून देते. दुभंगलेली शेपटी (caudal fin), अपूर्ण मध्यरेषा (lateral line), शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या (centrally projecting hooks) रचनेचा अभाव, तसेच शेपटीच्या पाठीवरील अग्रभागाकडे असलेल्या मुख्य पाठीचा पंख (dorsal procurrent) भागाशी एकरूप न होता स्पष्टपणे वेगळी असलेली adipose fin ची रचना या माशाला त्याच्या कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ओळख देते, असे त्यांनी सांगितले.

आपले गोवा राज्य हे पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता जपणारा एक महत्त्वपूर्ण अधिवास आहे. या प्रजातीची नोंद सध्या गोव्यातील रगाडा नदीच्या पात्रात व महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अशा दोन राज्यांतच झाली आहे. या दोन्ही ठिकाणांमधील अंतरही लक्षणीय असल्यामुळे या प्रजातीची उपस्थिती खूपच कमी आणि विखुरलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागांतील ओढे आणि प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संवेदनशील अधिवासांचे जतन केल्यास केवळ या प्रजातीचेच नव्हे, तर गोड्या पाण्यातील इतर अनेक माशांच्या प्रजातींचेही संरक्षण होऊ शकते. मात्र औद्योगिक प्रदूषण, सांडपाण्याचा निचरा, मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे सोडल्या गेलेल्या माशांच्या परकीय प्रजाती यांसारख्या घटकांमुळे येथील जलपरिसंस्थांवर धोका निर्माण होत असल्याची चिंता शिर्के यांनी व्यक्त केली.

जगातील जलसंपदेमध्ये असंख्य प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळतात आणि त्यापैकी अनेक प्रजाती अजूनही वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे अभ्यासल्या गेलेल्या नाहीत. जलपरिसंस्थेतील जैवविविधता समजून घेण्यासाठी नवीन प्रजातींचा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नवीन मासे प्रजातींचा शोध लागल्याने त्या परिसंस्थेची रचना, पर्यावरणीय संतुलन इत्यादी महत्त्वाची माहिती मिळते. सखोल निरीक्षण, नमुना संकलन आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे संशोधक अनेकदा अशा प्रजाती ओळखतात ज्यांची पूर्वी नोंद झालेली नसते. प्रस्तुत अभ्यासामध्ये विशिष्ट जलस्रोतामध्ये आढळलेल्या एका नवीन मासे प्रजातीचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, अधिवास, तसेच तिचे पर्यावरणीय महत्त्व यांचा अभ्यास करण्यात आला आहे. अम्लीसेप्स वायव्य या नव्या प्रजातीचा शोध पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवासांच्या पर्यावरणीय अभ्यासाची गरज अधोरेखित करत असल्याचे अभिषेक शिर्के म्हणाले.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका इलेक्ट्रिकल आणि 

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)