मडगाव रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कामगिरी; प्रवाशांचे साहित्य चोरणारी हरियाणातील टोळी अटकेत

मडगाव: रेल्वेतून प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या हरियाणातील 'सहाशी गँग'च्या चार सराईत गुन्हेगारांना मडगाव रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अटक करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३४,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
दक्षिण पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मडगाव रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली. हे चारही सराईत गुन्हेगार मत्स्यगंधा गाडीतून प्रवाशांचे सामान चोरून सुरतकल (कर्नाटक) येथून मडगाव रेल्वे स्थानकावर उतरणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांची पथके तयार केली. संशयितांपैकी तिघेजण रेल्वे गार्डच्या मागील जनरल डब्यातून प्रवास करत होते, तर एक संशयित पुढील जनरल डब्यातून प्रवास करत होता. रेल्वे मडगाव स्थानकावर येताच पुढील डब्यातील एका संशयिताने धावत्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चोरीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी संशयितांकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये बारा बांगड्या, चार हार, दोन नेकलेस, एक मंगळसूत्र, चार सोनसाखळ्या, एक मोत्याची माळ, सहा कानातले रिंग, चार अंगठ्या असा एकूण ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख ३४,५०० चा समावेश आहे. पोलिसांनी संशयित दिलबाग रिसाल सिंग (४२) आणि राजेश लिलू राम (४२) यांच्यासह अन्य दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे सर्व गुन्हेगार हरियाणातील सहाशी गावामधील असल्याचे रेल्वे सुरक्षा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.