
फोंडा : आज गोव्यातील (Goa) सहकार क्षेत्राला (Cooperative sector) एक बळकटी प्राप्त झाली आहे. सहकार क्षेत्राची ही घौडदौड अशीच चालू राहील. मात्र त्यासाठी निस्वार्थी व सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे सहकार क्षेत्रात येत राहिली पाहिजेत. असे उद्गार राज्यसभेचे खासदार (Rajya Sabha Member of Parliament) सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी काढले.

राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या निमित्ताने दक्षिण गोवा जिल्हा मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स सहकारी पतसंस्थेने (South Goa District Margao School Complex Cooperative Credit Society) आयोजित केलेल्या विद्यार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर एनआरआय आयुक्त व माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, संस्थेचे अध्यक्ष बाबाजी सावंत, डाॅ.गुणाजी देसाई आदी उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, तुम्हाला मोठे करण्यात तुमच्या पालकांचे व तुमच्या शिक्षकांचे बहुमूल्य असे योगदान आहे. जीवनात तुमचे भले व्हावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या तुमच्या शिक्षकांना सदोदित मान द्या .
मोठे झाल्यानंतर आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्या ऐवजी त्यांची काळजी घ्या.
चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान सोहळे संस्थांनी आयोजित करायला हवेत. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळत राहते.
यावेळी बोलताना नरेंद्र सावईकर म्हणाले की, सहकाराची ताकत आम्हाला कोविडच्या काळात कळून चुकली .त्या दरम्यान एका बाजूने जगातील आर्थिक व्यवस्था घुटमळत असताना भारतातील अर्थव्यवस्था मात्र सहकाराच्या जोरावर वृद्धिंगत होत राहिली होती.
प्रत्येकाने बचतीची सवय लावून घ्यायला शिकले पाहिजे. जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेत तुमचा पैसा बळकटी देत राहील. भविष्यात कितीही आर्थिक संकटे आले तरी तुमची ही बचत देशाला स्थैर्य प्राप्त करून देत राहील.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, उच्च शिक्षण घेण्याची आपली भूक कधीच कमी करू नका. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आज जगभरातील विद्यापीठे तुमची प्रतिक्षा करत आहेत.
हुशार विद्यार्थ्यांचा देश म्हणून आज भारताकडे पाहिले जाते. हा अभिमान असाच पुढे चालू ठेवण्यासाठी मेहनत करा.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष बाबाजी सावंत यांनी स्वागतपर भाषणात संस्थेतील पारदर्शकता व सभासदांचा पूर्ण विश्वास ज्याच्यामुळे गेल्या ४५ वर्षे संस्था सातत्याने प्रगती करत असल्याचे नमूद केले.
डॉ. गुणाजी देसाई व श्री. रघुवीर देसाई यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, श्री. उमेर मुठावली यांनी सूत्रसंचालन केले तर ज्योकीम फालेरो यांनी आभार प्रदर्शन केले.