मडगाव अग्निशामक दलाकडून वेळेत नियंत्रण, लाखो रुपयांची मालमत्ता वाचवली

मडगाव: कुडतरी येथील बातोरा बाजार भागात साल्वादोर ट्राव्हासो यांच्या घरातील रेफ्रिजरेटरला आग लागल्याने घराचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. मडगाव अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बातोरा, कुडतरी येथील साल्वादोर ट्राव्हासो यांच्या घराला आग लागल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यावर साल्वादोर यांच्या घरातील फ्रीजला आग लागल्याचे दिसून आले. या आगीत घरातील छपरासह इलेक्ट्रिक वायरिंग जळाले. यात सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने वेळेत आग विझवून सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली आहे.