बुडणाऱ्या मित्राला वाचवताना हैदराबादचा पर्यटक बुडाला

बागा कळंगुटमधील घटना : शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
बुडणाऱ्या मित्राला वाचवताना हैदराबादचा पर्यटक बुडाला

म्हापसा : बागा-कळंगुट समुद्रकिनारी आपल्या बुडणाऱ्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात हैदराबाद (तेलंगणा) येथील परवेझ शेख (वय २४) नावाचा पर्यटक युवक समुद्राच्या लाटांमध्ये बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुदैवाने, त्याचे दुसरे मित्र मोहम्मद इब्राहिम (वय २४) यांना किनारी तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्परतेने वाचवले.
ही दुर्घटना बागा-कळंगुट येथील 'टिटोस लेन' परिसरातील समुद्रकिनारी सायंकाळी घडली. बेपत्ता झालेला परवेझ शेख हा आपल्या पाच मित्रांसोबत सोमवारीच गोव्यात पर्यटनासाठी दाखल झाला होता. सायंकाळच्या वेळी त्यांचा हा गट समुद्रकिनारी आला असता, मोहम्मद इब्राहिम हा पाण्यात अंघोळीसाठी उतरला. काही वेळातच इब्राहिम पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याचे परवेझच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून परवेझने क्षणाचाही विलंब न करता आपल्या मित्राला वाचवण्यासाठी थेट समुद्राच्या पाण्यात उडी घेतली.
इतर मित्रांनी आरडाओरड करत किनारी तैनात असलेल्या ‘दृष्टी मरीन’च्या जीवरक्षकांना घटनेची माहिती दिली. जीवरक्षकांनी तत्काळ पाण्यात धाव घेत मोहम्मद इब्राहिम याला वाचवले आणि त्याला सुखरूप बाहेर काढले. मात्र, मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला परवेझ शेख हा मात्र समुद्राच्या लाटांमध्ये बेपत्ता झाला. जीवरक्षकांनी त्याचा शोध घेण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस, पर्यटक पोलीस आणि किनारी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. किनारी पोलीस आणि जीवरक्षकांनी रात्री उशिरापर्यंत समुद्राच्या पाण्यात बेपत्ता युवकाचा कसून शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
प्रवासाची बिकट कहाणी
बेपत्ता झालेल्या या पर्यटक मित्रांची गोव्यापर्यंतची कहाणीही बिकट होती. हैदराबादहून बसने निघालेल्या त्यांच्या प्रवासी बसमध्ये वाटेत बिघाड झाला. त्यानंतर या गटाने भाड्याची टॅक्सी करून प्रवास केला आणि ते सोमवारी गोव्यात पोहोचले होते. विशेष म्हणजे, या टॅक्सीचे भाडे देखील बेपत्ता परवेझ शेख याने स्वतःच्या खिशातून दिले होते. अशा स्थितीत गोवा गाठल्यानंतर लगेचच ही दुःखद घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा