राजस्थानची वीज उत्पादनात अव्वल बनण्याकडे वाटचाल

२०३० पर्यंत १०० गिगा वॅट वीज निर्मितीचे लक्ष्य; पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांवर मोठा भर

Story: उमेश झर्मेकर । गोवन वार्ता |
2 hours ago
राजस्थानची वीज उत्पादनात अव्वल बनण्याकडे वाटचाल

म्हापसा: देशात पवन आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीवर केंद्र सरकारने मोठा भर दिला आहे. गुजरातनंतर आता राजस्थाननेही या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आगामी २०३० पर्यंत १०० गिगा वॅटवीज उत्पादन करून देशातील वीज निर्मितीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य बनण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य राजस्थानने बाळगले असून, त्या दिशेने राज्याची वेगाने वाटचाल सुरू आहे.

वाळवंटी जिल्ह्यांत पवनचक्कीचे केंद्र

राजस्थानातील एकेकाळी वाळवंटी आणि ओसाड समजला जाणारा जैसलमेर, बाडमेर व जोधपूर हा भाग आता पवनचक्की प्रकल्पांचे केंद्र बनला आहे. या वाळवंटी जमिनींमध्ये मोठे उद्योपती, सिने कलाकार आणि क्रीडापटूंनी पवनचक्की टर्बाइन प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हजारो किलोमीटर क्षेत्र आता पवनचक्की टर्बाइन मनोऱ्यांनी व्यापले गेले आहे.

शासकीय धोरणांची मदत

वीज टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये केंद्र सरकारने पवन आणि सौर या अक्षय ऊर्जेमध्ये गुंतवणूकदार विकासकांना प्रोत्साहन देण्यासाठी लिलावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. यातून 'आऊटसोर्स' गुंतवणूकदारांना योग्य सवलत व मोबदला मिळण्यास मदत मिळाली.

याचा फायदा घेत राजस्थान सरकारने राजस्थान विद्युत प्रसारण लिमिटेडच्या माध्यमातून पवनचक्की आणि सौर ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी भरारी घेतली. जैसलमेरनंतर जोधपूर आणि बाडमेर जिल्ह्यांमधील वाळवंट जमिनीमध्ये पवनचक्कीचे मनोरे उभारण्याला प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक विकासकांनी गुंतवणूक केली असून, त्यातून आतापर्यंत ५.२ गिगा वॅट वीज निर्मिती होत आहे.

२०३० पर्यंत १०० गिगावॅटचे ध्येय

या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे आगामी पाच वर्षांत म्हणजेच २०३० पर्यंत पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पातून १०० गिगा वॅट वीज निर्मिती करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे. राजस्थान विद्युत प्रसारण लिमिटेडचे बेनसरा-जैसलमेर विभागचे प्रधान अभियंता प्रशांत लोधा यांनी ही माहिती दिली. मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीमुळे राजस्थान राज्य स्वावलंबी बनेल. जनतेला माफक दरात वीज पुरवठा करणे शक्य होईल, तसेच दिवसरात्र अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होईल.

पवनचक्की गुंतवणुकीचे अर्थकारण

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पवनचक्कीचा एक टर्बाइन मनोरा उभारण्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च येतो, जो एकाच वेळी करावा लागतो. या टर्बाइनची कालमर्यादा २५ वर्षे असते. पवनचक्कीतून निर्माण होणाऱ्या विजेतून पाच वर्षांत गुंतवलेल्या पैशांची परतफेड होते आणि त्यानंतरची २० वर्षे या प्रकल्पातून गुंतवणूकदाराला नफा आणि मोबदला मिळत राहतो.

हेही वाचा