१,२०० पोलीस तैनात : तीन टप्प्यांची सुरक्षा व्यवस्था, एकूण १५०० हून अधिक कर्मचारी
पणजी : ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) (iffi) सुरक्षा तसेच आपत्कालीन सेवेसाठी गोवा पोलीस (Goa Police), अग्निशामक दल (Goa Fire Brigade) आणि १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिका (108 Ambulance) व इतर यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी सुमारे १,२०० पोलीस व इतर यंत्रणांचे मिळून १,५०० हून जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गोवा पोलिसांनी भारतीय रिझर्व बटालियनच्या चार प्लॅटूनसह इतर कर्मचारी मिळून सुमारे १,२०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त अग्निशामक दलाचे सुमारे ८० कर्मचारी, तर १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिकेचे कर्मचारी व इतर आपत्कालीन यंत्रणेचे मिळून १,५०० हून जास्त कर्मचारी तैनात केले आहेत. यंदाही गोवा पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून गोवा पोलिसांनी भारतीय रिझर्व बटालियन (आयआरबी) व इतर विभागाच्या पोलिसांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था हाती घेतली आहे.
आयनॉक्स, मॅकेनीझ पॅलेस आणि पर्वरी येथील आयनॉक्समध्ये चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या शिवाय मिरामार समुद्रकिनारी, हणजूण येथे समुद्रकिनारी व मडगावच्या रवींद्र भवन येथे खुला पडदा लावण्यात येणार आहे. भगवान महावीर बालोद्यान तसेच कला उद्यान येथे मनोरंजन झोन करण्यात आला आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत.
उद्घाटन सोहळा, दर दिवशी तसेच समारोप सोहळा अशा तीन सुरक्षा योजना पोलिसांनी केल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यावेळी गोवा पोलिसांचे ५२७ अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जातील. या दिवशी एक अधीक्षक, ४ उपअधीक्षक, १६ निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक, ३० साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ३४ हवालदार, ३११ कॉन्स्टेबल, ९७ महिला पोलीस काॅन्स्टेबल मिळून पोलीस कर्मचारी ५२७ तैनात केले आहेत. दर दिवशी ३६५, तर समारोप सोहळ्यादिवशी ३५३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. या शिवाय भारतीय रिझर्व बटालियनचे (आयआरबी) दोन पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षकांसह ४३ पुरुष आणि ४३ महिला कर्मचाऱ्यांच्या मिळून चार प्लॅटून तैनात केल्या आहेत. तसेच वाहतूक विभागाचे ३०० पोलीस कर्मचारी, गोवा पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बाॅम्ब निकामी करणारे पथक (बीडीएस), जलद कृती दलाचे पोलीस तसेच विशेष विभागाचे पोलीस व इतर कर्मचारी सुरक्षा यंत्रणेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
अग्निशामक दलाचे ८० कर्मचारी, यंत्रणा तैनात
अग्निशामक दलाने महोत्सवाच्या विविध ठिकाणी सुमारे ८० कर्मचारी तैनात केले आहेत. उद्घाटन आणि समारोप ठिकाणी २० कर्मचारी, पूर्णवेळ तीन, तर उद्घाटन आणि समारोप दिवशी अतिरिक्त दोन असे सात, १२ हजार लिटरचे बंब आणि सुमारे ५० अग्निरोधक साहित्य (फायर एक्सटिंग्युअर) ठेवले आहेत. या व्यतिरिक्त आयनाॅक्स, मॅकेनीझ पॅलेस, पर्वरी येथील आयनाॅक्स तसेच इतर महोत्सवाच्या ठिकाणी मिळून सात ठिकाणी बंब, जलद प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) आणि दोन मोटारसायकल प्रतिसाद युनिट (एमआरयू) ठेवली आहेत.
वैद्यकीय यंत्रणा सज्ज
वैद्यकीय यंत्रणेसाठी १०८ जीव्हीके इएमआरआयचे कर्मचारी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त संपूर्ण महोत्सवाच्या ठिकाणी रुग्णवाहिका तसेच दुचाकी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आपत्कालीन वेळी आवश्यकता भासल्यास इतर यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे.