राज्यातील लोकांची अधिकाधिक पसंती : यूपीआय व्यवहार ५,२८२ कोटी रुपयांवर

पणजी : यूपीआय ॲपद्वारे पेमेंट (UPI app payment) करणे हा पर्याय सुलभ झाला आहे. वापरण्यास सोपे, सुरक्षित असल्याने यूपीआय ॲपचा वापर वाढत आहे. यामुळे मागील एका महिन्यात गोव्यात (Goa) यूपीआय ॲपद्वारे झालेल्या व्यवहारात ६७९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात यूपीआय ॲपद्वारे ४,६०३ कोटी रुपये झाले होते. ऑक्टोबरमध्ये ते वाढून ५,२८२ कोटी रुपये झाले. केंद्रीय अर्थ खात्याने (Union Finance Ministry) जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
यूपीआय ॲपमध्ये विविध बँकाच्या ॲपसह भीमपे (Bhim pay), गुगल पे (Google pay), पेटीएम (Paytm) अशा ॲपचा समावेश आहे. मे महिना वगळता मागील काही महिन्यात राज्यातील यूपीआय ॲपद्वारे पेमेंट करण्यात वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल महिन्यात ५०४१ कोटी, मे मध्ये ५६५९ कोटी, जूनमध्ये ४०५३ कोटी, जुलैमध्ये ४३४७, तर ऑगस्ट मध्ये ४५३७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान यूपीआयद्वारे पेमेंट करण्यात गोवा देशात २३ व्या स्थानी राहिला.
संपूर्ण देशाचा विचार केल्यास ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात २.६७ लाख कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार हे यूपीआय ॲपद्वारे करण्यात आले आहेत. यानंतर उत्तर प्रदेश (१.५३ लाख कोटी), कर्नाटक (१.५० लाख कोटी), तेलंगणा (१.३० लाख कोटी) या राज्यांचा क्रमांक लागतो. नागालँड, मिझोरम, त्रिपुरा येथे यूपीआय व्यवहारांचे प्रमाण तुलनेने कमी होते. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात सुमारे ७६ हजार कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार हे ग्रोसरी दुकाने अथवा सुपर मार्केटमध्ये झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
महिन्याला ३.५८ कोटी ट्रान्जॅक्शन
अर्थ खात्याच्या आकडेवारीनुसार गोव्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एकूण व्यवहारांसाठी ३.५८ कोटी ट्रान्जॅक्शन झाली आहेत. याचाच अर्थ दिवसाला सरासरी ११.५४ लाख यूपीआय ॲप ट्रान्जॅक्शन झाली आहेत.