पोलिसांच्या विश्वासार्हतेला आव्हान

पोलीस या घटनांचा शोध लावण्यात वारंवार अपयशी होत असल्यामुळे लोकांचा आता सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. पोलिसांच्या केवळ कार्यक्षमतेलाच नाही, तर विश्वासार्हतेलाही सध्या आव्हान आहे.

Story: संपादकीय |
2 hours ago
पोलिसांच्या विश्वासार्हतेला आव्हान

एका दरोड्याचा तपास लागत नाही आणि त्याच काळात दुसरा दरोडा पडतो. दुसऱ्याचा शोध लागत नाही, तर तिसरा दरोडा पडतो. पण यातील एकाही दरोड्यातील आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये असे प्रथमच घडत आहे, की दरोड्यावर दरोडे पडत आहेत आणि दरोडेखोर पोलिसांना सापडत नाहीत. यापूर्वी पडलेल्या दोन्ही दरोड्यातील आरोपी देशाबाहेर, म्हणजेच बांगलादेशात पळाल्याचे सिद्ध झाल्यामुळे, त्यांना मदत करणाऱ्या काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांना अटक केलेली असतानाही वास्कोतील बायणा परिसरातील एका इमारतीत पुन्हा दरोडा पडला. दोनापावला येथे एका उद्योजकाच्या घरी पडलेला दरोडा, गणेशपुरी - म्हापसा येथे डॉक्टरांच्या घरावर पडलेला दरोडा आणि बायणा - वास्कोतील चामुंडी आर्केडमध्ये पडलेला दरोडा यात साम्य असले तरी दरोडेखोरांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बायणा येथील फ्लॅटमध्ये दरोडा पडण्यापूर्वी सांताक्रूझ परिसरातील एका फ्लॅटमध्येही मोठी चोरी झाली, ज्यात सुमारे २५ लाखांचा ऐवज चोरीला गेला. गोवा पोलिसांना आव्हान देत दरोडेखोर गोव्यातील वेगवेगळ्या भागांत दरोडे घालत सुटले आहेत, पण पोलिसांच्या कुठल्याच गस्तीत ते सापडत नाहीत, याचे आश्चर्य आहे. 

बायणा येथील सागर नायक यांच्या घरातील दरोडा हा पूर्ण नियोजित होता, कारण त्यांचे घरच सातव्या मजल्यावर आहे. तिथे जाण्यासाठी आणि इमारतीच्या परिसरात येण्यासाठी चोरट्यांनी जी पद्धत वापरली ती पाहता हा दरोडा पूर्ण रेकी केल्यानंतर करण्यात आला. म्हणजे चोरांनी किंवा त्यांना मदत करणाऱ्यांनी या परिसरात यापूर्वी येऊन पाहणी केली होती. उत्सवाच्या निमित्ताने घरात आणून ठेवलेल्या दागिन्यांबद्दल त्यांना माहिती होती? हा दरोडाच होता की अन्य कुठला प्रकार, या साऱ्या गोष्टींची पडताळणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढण्याची गरज आहे. 

एकाही दरोड्यातील चोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत त्यामुळे लोकांनी पोलिसांवर विश्वास कसा ठेवावा, याचा विचार पोलिसांनी करण्याची वेळ आली आहे. सात महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये दोनापावला येथे ‘धेंपो विस्ता’ बंगल्यावर दरोडा घालण्यात आला. करोडोंचे दागिने आणि रोख रक्कम त्या दरोड्यातून चोरांनी पळवली. ते कधीच पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये गणेशपुरी येथे डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर दरोडा घालण्यात आला. तिथेही सुमारे पन्नास लाखांचे दागिने आणि रोख रक्कम पळवली. त्या चोरांचा पोलिसांनी माग काढला, पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच चोर बांगलादेशात पळाले. त्यांना दरोड्यात मदत करणारे त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती लागले असले तरी मुख्य आरोपी, दरोडेखोर अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. हे सगळे प्रकार सुरू असतानाच आता बायणा येथील इमारतीत दरोडा टाकून लाखोंच्या वस्तू आणि रोख रक्कम पळवली. हा दरोडा पडण्यापूर्वी तिसवाडीतील सांताक्रूझ परिसरातही मोठी चोरी झाली. त्या चोरीत रोख रकमेसह दागिने असा सुमारे २५ लाखांचा ऐवज पळवला. कदाचित सांताक्रूझची चोरी आणि बायणा येथील दरोडा यात एकच टोळीही असू शकेल, पण पोलिसांना अद्याप काहीच सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांची नाचक्की होत आहे. पोलीस गस्त वाढवल्याचे सांगतात, तरीही मोठे गुन्हे घडत आहेत. विशेषतः दरोड्यांसारख्या गंभीर घटना घडत आहेत. गेल्या सात महिन्यात पडलेले तिन्ही दरोडे हे वर्दळीच्या भागातील आहेत. दोनापावला सारख्या भागात जिथे मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक राहतात, अनेक राजकीय नेत्यांची तिथे घरे आहेत, अशा ठिकाणी दरोडेखोर घरात घुसून दरोडा घालतात. गणेशपुरी सारख्या गजबजलेल्या भागात दरोडेखोर मध्यरात्री येऊन घरातील लोकांना बांधून घालून घर लुटतात. बायणात पडलेला दरोडा तर सातव्या मजल्यावर जाऊन घातलेला आहे. तिथेही कुटुंबातील लोकांना बांधून घालून, मारहाण करून घरातील सारे दागिने, रोख रक्कम पळवली गेली. हे सगळे गुन्हे लोकवस्तीच्या परिसरात घडत असल्यामुळे आणि तिन्ही दरोड्यात साम्य असल्यामुळे जनतेने अधिक सतर्क होण्याची गरज आहे. निश्चितच यात मोठ्या टोळीचा हात असू शकतो किंवा सर्व दरोड्यातील चोर एकमेकांशी संबंधितही असू शकतात. त्यांना मदत करणारे, माहिती देणारेही वेगळे लोक असू शकतात. पोलीस या घटनांचा शोध लावण्यात वारंवार अपयशी होत असल्यामुळे लोकांचा आता सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. पोलिसांच्या केवळ कार्यक्षमतेलाच नाही, तर विश्वासार्हतेलाही सध्या आव्हान आहे.