
देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक ठरलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजनेचे काम जलदगतीने सुरू आहे. या बुलेट ट्रेन मार्गामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्रशासित दादरा-नगर हवेली हे प्रदेश अखेर हायस्पीड रेल्वेने जोडले जाणार आहेत. अंदाजे ५०८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात गुजरात आणि दादरा-नगर हवेलीचा मिळून ३५२ किलोमीटर भूभाग येतो, तर महाराष्ट्रात १५६ किलोमीटरचा मार्ग विकसित होत आहे.
हा हायस्पीड कॉरिडॉर देशातील आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा अनेक शहरांना जोडणार आहे. त्यात साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरुच, सूरत, बिलिमोरा, वाडीवेल, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेग आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढणार असून आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे भारतात हायस्पीड कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगाची सुरुवात होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
एकूण ५०८ किलोमीटरपैकी तब्बल ४६५ किलोमीटर मार्ग उड्डाणपूलांवर बांधण्यात येत आहे. हे प्रमाण जवळपास ८५ टक्के असून त्यामुळे जमिनीचा वापर कमी होण्याबरोबरच सुरक्षितता, स्थैर्य आणि भविष्यातील देखभाल खर्चात मोठी बचत होणार आहे. प्रकल्पातील मोठा भाग वेगाने पूर्ण होत असून आतापर्यंत ३२६ किलोमीटर उड्डाणपुलांचे काम पूर्णत्वास गेले आहे. तसेच या मार्गावरील २५ पैकी १७ नदीवरील पुलांचे बांधकामही पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास केवळ सुमारे दोन तासांत होणार आहे. सध्याच्या प्रवास वेळेच्या तुलनेत हा अभूतपूर्व बदल ठरणार आहे.
दरम्यान, सूरत-बिलिमोरा हा अंदाजे ४७ किलोमीटरचा महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या विभागातील सिव्हिल स्ट्रक्चर आणि ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून लवकरच येथे प्रणाली परीक्षणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सूरत स्टेशनचे डिझाइन शहरातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या हिरा उद्योगावर आधारित असून स्टेशनमध्ये विशाल प्रतीक्षालये, स्वच्छ शौचालये, किरकोळ दुकाने आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय, हे स्टेशन सूरत मेट्रो, शहर बस सेवा आणि भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कशी जोडले जाणार आहे. या मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर हा कॉरिडॉर राष्ट्राच्या परिवहन क्षेत्रातील नवा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- प्रसन्ना कोचरेकर