बिहारात ‘एनडीए’चा महाविजय

आरोग्य बिघडले असले तरी नितीश कुमार अजूनही बिहारचे सर्वांत विश्वासार्ह नेते आहेत. बिहारची अस्मिता ते उत्तमपणे मांडतात. ना कुटुंबवाद, ना वंशवादी राजकारण, ना भ्रष्टाचाराची छाया, ना मुस्लिमविरोधी वक्तव्ये, त्यामुळे त्यांचा स्वीकार सर्वत्र आहे.

Story: संपादकीय |
14th November, 11:48 pm
बिहारात ‘एनडीए’चा महाविजय

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बिहार विधानसभा निवडणूक जिंकेल हे जवळपास ठरलेलेच होते. तरीही, निकाल आश्चर्यचकित करणारे आहेत, कारण विजयाचे प्रमाण इतके मोठे असेल, अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती. महिलांच्या खात्यात जमा झालेल्या दहा हजार रुपयांनी एनडीएच्या प्रचारासाठी भक्कम पाया तयार केला. महिला मतदारांनी कमाल करून दाखवली. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या दोघांचीही महिला मतदारांवर केंद्रित दुहेरी इंजिनची राजकीय रणनीती पूर्णपणे फलदायी ठरली, असे म्हणता येईल. चिराग पासवान यांनी यावेळी एनडीएमध्ये प्रवेश केल्याचा लाभ झाल्याचे दिसून आले. २०२० च्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र लढत देऊन जनता दल-युनायटेडची मते फोडली होती. या निवडणुकीत त्यांच्या उपस्थितीने एनडीएला उलट मोठी मदत झाली. दलित पासवान मते जेडीयूच्या अतिपिछड्या व पिछड्या वर्गांच्या मतांमध्ये आणि भाजपच्या उच्चवर्णीय मतांमध्ये सहज मिसळली. मुसहार हा हिंदुस्तानी आवाम मंचचे जितन राम मांझी प्रतिनिधित्व करणारा सर्वात गरीब घटक, पासवान, ब्राह्मण, भूमिहार आणि विविध ओबीसी मतदार एनडीएच्या छताखाली आले. अपवाद ठरले ते यादव व मुस्लिम मतदार. यादव आणि मुस्लिम मतदार विरोधकांच्या महागठबंधनाकडेच राहिले. एका बाजूला यादव व मुस्लिम मतांचे विरोधकांनी धुव्रीकरण केले, तर दुसरीकडे अन्य सारे समाज एनडीएच्या बाजूने राहिले असे स्पष्टपणे दिसते आहे. दोन घटक वगळता बिहारच्या सर्व जाती वर्गांनी एनडीएला पाठिंबा दिलेला हा जनादेश अभूतपूर्व आहे. याशिवाय, ११ नोव्हेंबरच्या म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी दिल्लीतील बॉम्बस्फोटाने काही मतदार एनडीएकडे झुकले असणे शक्य आहे.

काहींच्या मते बिहारपुढे बदल किंवा आहे तेच टिकवणे असे दोन पर्याय होते, मात्र हे चुकीचे ठरले असे निकालानंतर दिसून येत आहे. बिहारच्या मतदारांनी नितीश कुमारांनी केलेले काम प्रत्यक्ष पाहिले. वीजपुरवठ्यात सुधारणा झाली, कायदा-सुव्यवस्थाही पूर्वीपेक्षा खूप सुधारली. दारूबंदीमुळे स्थानिक गुंडगिरी वाढली असली तरी जनतेचा एकूण विश्वास नितीश यांच्यावरच कायम राहिला. मतदारांना वाटते की बिहार विकासाच्या वाटेने चालले आहे. भविष्यात त्यांना आरोग्य व शिक्षणात मोठे बदल अपेक्षित आहेत. म्हणूनच मतदार पुढील टप्प्यातील परिवर्तनाच्या आशेने मतदान केंद्रात गेले. सरकार बदलणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने नितीश कुमारांनी केलेल्या सुधारणांना पूर्णविराम देणे ठरले असते. याचाच अर्थ  नितीश कुमार पुन्हा एकदा खेळाचे कप्तान ठरले. आरोग्य बिघडले असले तरी ते अजूनही बिहारचे सर्वांत विश्वासार्ह नेते आहेत. बिहारची अस्मिता ते उत्तमपणे मांडतात. ना कुटुंबवाद, ना वंशवादी राजकारण, ना भ्रष्टाचाराची छाया, ना मुस्लिमविरोधी वक्तव्ये, त्यामुळे त्यांचा स्वीकार सर्वत्र आहे. सामाजिक न्यायाच्या लढ्याच्या बिहारच्या आठवणी ते स्वतः सोबत घेऊन चालतात. लालू-राबडी युगानंतरच्या गोंधळातून त्यांनी बिहारला बाहेर काढले, असे मतदारांना वाटल्यामुळेच एनडीएला भरघोस मतदान झाले यात शंका नाही. नितीश कुमार कधीही उतावळे, भडकाऊ भाषण करणारे नव्हते; शांतपणे काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

ही निवडणूक म्हणजे कृतज्ञ बिहारकडून नितीश बाबूंना दिलेली पोचपावती आहे. आता बिहार पूर्वीसारखा राहणार नाही. बिहार अधिकाधिक केशरी रंगात रंगेल अशी चिन्हे दिसतात. रा. स्व. संघाने उपस्थित केलेल्या लोकसंख्याविषयक बदलांच्या मुद्द्यांचे पुढील काळात बिहारच्या राजकारणावर वर्चस्व राहील, असे भाजपला मिळालेल्या यशावरून दिसते आहे. खरे तर आता बिहारची वाटचाल केवळ भाजपच्या दिशेनेच होत राहील. नितीश बाबू हळूहळू राजकारणातून बाजूला होतील, पण त्यांच्या कामगिरीची नोंद २१ व्या शतकातील बिहारच्या इतिहासात कायमस्वरुपी राहील. निकालावर नजर टाकली तर एनडीएने मोठ्या झटक्याने विजय मिळविला आहे; २०० चा आकडा ओलांडणे तसे सोपे नव्हते. विरोधी पक्षांचे महागठबंधन अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही; उलट सत्ता राखण्यात एनडीए सक्षम ठरली. खरे तर हा सत्ताधारी आघाडीचा महाविजय आहे. काँग्रेसची धुळधाण त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये दुही माजवणारी ठरेल, असे दिसते. पदयात्रा नको, प्रत्यक्ष मतदारांना भेटा हा कानमंत्र ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी निकालानंतर दिला आहे, त्यावर सतत पराभूत होणाऱ्या नेतृत्वाने विचार करावा. पश्चिम बंगालचा नंबर यानंतर लागेल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान त्या पक्षाचा आत्मविश्वास दर्शविते.

बिहारचा निकाल हा फक्त एका राज्याचा परिणाम नाही, तो राष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पाही आहे. कारण या राज्यातील राजकारणाने पुढील लोकसभा व इतर मोठ्या राज्यांतील निकालांसाठी दिशा दाखवून दिली आहे. विकासाचे व आश्वासनांचे वारे सतत वाहत नाहीत. आता गरज आहे ती आश्वासनपूर्तीची.