
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक गुन्हेगारी कारवायांमुळे गोवा चर्चेत आहे. यात भर म्हणून आता नोकरीसाठी पैसे घेण्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक केली गेली. सरकारी नोकरी ही शिफारशीने किंवा पैसे देऊन मिळते, असा नागरिकांचा समज असल्याने ते अशा ठकबाजांना सहज बळी पडतात. सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. यात प्रामुख्याने तीन ते चार ठकबाजांचा समावेश आहे. नोकरीसाठी पैसे देण्याच्या प्रकरणातील संशयित पूजा नाईकने नुकत्याच प्रुडंट मीडियाशी बोलताना या घोटाळ्याचा धक्कादायक खुलासा केला. तिने २०१९ ते २०२२ या कालावधीत झालेल्या मेगा नोकरीभरतीदरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याला आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अभियंत्याला ६१३ जणांकडून सुमारे १७.६८ कोटी रुपये गोळा करून दिल्याचा दावा केला. एका विद्यमान मंत्राने तिची ओळख संबंधित अधिकाऱ्यांशी करून दिल्याचा दावाही तिने केला आहे. या दाव्यानंतर गुन्हा शाखेने तिची चौकशी सुरू केली. याच दरम्यान पूजा नाईकने वरील अधिकाऱ्यांची नावे उघड केली. त्याचबरोबर, आपण पैसे घेऊन ८० हून अधिक जणांना नोकरी मिळवून दिली आहे. परंतु २०१९ ते २०२२ दरम्यान झालेल्या मेगा नोकरीभरतीदरम्यान मी पैसे घेतलेल्या कोणत्याही उमेदवाराला नोकरी मिळाली नाही. आमची नऊ जणांची टिम असून, सर्वांना अटक झाल्याचा दावा तिने केला. मात्र या संदर्भात अधिक माहिती देण्यास तिने नकार
दिला.
शिक्षित तरुणांच्या बेरोजगारीमुळे पालक सरकारी नोकरीच्या आशेने वरील गुन्हेगारांना बळी पडून फसवणूक करून घेतात. या फसवणुकीसाठी गुन्हेगारांबरोबर पालकही तेवढेच जबाबदार आहेत. काही पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता वेगळ्याच पदांसाठी पैसे दिल्याचेही समोर आले आहे.
राज्यात गेल्या वर्षी वरील प्रकरणी विविध पोलीस स्थानकांत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यासंदर्भात पोलिसांनी २९ गुन्हे दाखल करून ३३ जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून १६६ ग्रॅम सोने, दोन मिनीबस, १२ आलिशान चारचाकी आणि इतर साहित्य जप्त केले होते. या संदर्भात पूजा नाईकवर दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी कारवाई केली असतानाही, संशयितांनी नवीन दावे केले आहेत. त्यामुळे या संदर्भात सरकारने योग्य कारवाई करून सत्य काय ते नागरिकांसमोर आणणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत नोकरभरती मार्गी लावणे आवश्यक आहे. सरकारी नोकरी ही शिफारस किंवा इतर मार्गाने मिळते, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. सरकारी नोकरी ही केवळ गुणवत्तेच्या आधारावर मिळते, हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा फसवणुकीचे प्रकार थांबतील. त्यासाठी सरकारने वरील उपाययोजनांसह या प्रकरणाची चौकशी पारदर्शकरित्या करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे.
- प्रसाद शेट काणकोणकर