वेदांचे सार भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात

अनेकानेक वेदग्रंथांमधील जो काही अंतर्गत अभिप्राय म्हणजे सार आहे, ते सगळे महाभारतात सामावलेले आहे आणि त्या वेदांच्या साराचा जो एकूण आशय आहे तोच कृष्णार्जुन-संवादाच्या गीतेत ओतप्रोत भरलेला आहे!

Story: विचारचक्र |
16th November, 09:49 pm
वेदांचे सार भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात

हे सद्गुरुराया, आपण उदारतेने दिलेले वचन म्हणजे अभयाचे वरदानच आहे. आणि ते असले की मग नव-रस-सुधाब्धीचा ठाव सुखेनैव घेता येणे सहज शक्य होते. (अंत:करणाच्या वृत्तीचे काही कारणाने, गद्य, पद्य वा काव्याच्या वाचनाने व पाहिलेल्या प्रसंगाने वा चित्राने, उद्दीपन होऊन त्या उद्दिपित झालेल्या वृत्तीच्या अनुभवाने किंवा अवलोकनाने अनुरूपे विचार प्रकट करण्याची प्रेरणा होते. तिला साहित्यशास्त्रात 'रस' म्हणतात. या अनुरूप विचार सुचण्याच्या वा प्रकट होण्याच्या क्रियेत एक प्रकारे आनंद वाटतो, म्हणून रस म्हणजे 'गोडी' हा अर्थही ठीकच. साहित्यशास्त्रात नऊ रस वर्णिलेले आहेत. ते असे - शृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत. 

हे गुरुराया, आपल्या स्नेहप्रेमाची देवी जी वागेश्वरी, तिची जर मुक्यावर कृपा झाली, तर तो देखील ग्रंथरचनेत देवांचे गुरू प्रत्यक्ष बृहस्पतींबरोबर सुद्धा स्पर्धा करू शकतो! ज्याच्या मस्तकावर तुमचा पद्म-हस्त पडून कृपादृष्टी होते, तो साधा जीव असला तरी शिव-स्वरूपाची योग्यता त्याला लाभते! आपल्या ज्या सामर्थ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडू शकतात, त्याची मी माझ्या दुर्बळ वाचेने कशी व किती वाखाणणी करू शकणार?

चांगला रंग लावून सूर्याचे अंग ते काय उजळणार? जो जात्याच कल्पवृक्ष आहे, त्याला फुलांनी काय सजवणार? कापुराल सुगंध कशाने आणणार? क्षीरसमुद्राचा पाहुणचार तो कशाने करणार? अमृताल काय पक्वान्न करून वाढणार? चंदनाल लेप तो कसला लावणार? आकाशाला मंडप तो काय घालणार? तसे श्रीगुरूंचे वर्णन ते काय करणार? श्रीगुरूंचे संपूर्ण सामर्थ्य कळू शकेल असे साधन तरी आहे का कुठले? म्हणून मी निवांततेने श्री सद्गुरूंना भक्तिभावाने फक्त नमन करतो.

कारण बुद्धीच्या बळावर गुरूचा महिमा वर्णायला गेले तर ते अभ्रकाचे पुट मोत्यांवर चढवण्यासारखे किंवा चांदीच्या वर्खाने सोने मढवावे तसे होते. म्हणून आता मौन स्वीकारून श्रीगुरुचरणी लीन होणे, हेच श्रेयस्कर!

हे गुरुराया, हे स्वामी, इतक्या आपलेपणाने तुम्ही ही जी कृपा माझ्यावर केलीत, तिच्या योगे मी प्रयागक्षेत्रीच्या वटवृक्षासारखा प्रत्यक्ष कृष्णर्जुन-संगमाचा चिरंतन साक्षीदार झालो आहे. जसे बाल-भक्त उपमन्यूने दुधासाठी हट्ट धरला असता, नीळकंठाने लाविली "क्षीराब्धीची वाटी तयाचिया ओठी," तसा हा प्रकार झाला आहे. (पुराण नावाच्या आपल्या अतिप्राचीन इतिहासात असा उल्लेख आहे की वसिष्ठकुळातील व्याघ्रपाद नामक ऋषीला उपमन्यु व धौम्य असे दोन मुलगे होते. घरच्या गरिबीमुळे त्यांची आई त्यांना दुधाऐवजी पाण्यात पीठ कालवून देत असे. एकदा उपमन्यु ताज्या दुधाकरिता आईजवळ हट्ट धरून बसला. "दूध पिण्याइतकी तुमची पूर्वपुण्याई नाही," असे आई त्यास म्हणाली. हे ऐकून उपमन्यूने शंकराची आराधना केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकराने त्यास क्षीरसागरच दिला. भक्त ध्रुवबाळ रुसला असता श्रीविष्णूंनी कौतुकाने त्याला अढळ असे ध्रुवपदच दिले!

तसे श्रीमद्भगवद्गीता नावाचा जो अध्यात्माचा पवित्र ग्रंथ आहे, जे सकळ शास्त्रांच्या विश्रांतीचे स्थान आहे, त्याचे व्याख्यान करायला, तो प्राकृतात म्हणजे मराठीमध्ये ओवी-छंदामध्ये गाण्यास मला बळ, हे गुरुराया, तुम्हीच दिले आहे. तसे बघायला गेले तर शब्दांच्या रानात वाचा-वृक्ष कितीही चांगला व मोठा असला, तरी त्याला विवेकाची फळे लागल्याचे सर्वसाधारणपणे आढळत नाही! पण तुम्ही तर आता माझ्या वाणीलाच विवेकाची कल्प-लता केली आहे! आधी देहाशीच तादात्म्यता झाली होती. आता तर बुद्धीही आत्मरूप झाली आहे. मग आता ब्रह्मानंदाचा भांडारा करायला काय शिंगे उरली आहेत काय? आणि माझे मन तर आता अक्षरशः गीतार्थाच्या क्षीरसागरांत निवांत झोपले आहे. इतके हे सद्गुरो, आपले सामर्थ्य अपार आहे. कसे वर्णन करू त्याचे?

बरे, आत्तापर्यंत जे काही धिटाईने बोलून गेलो ते आपण आपल्या कृपेच्या लीलेने सहन करावं ही प्रार्थना. आपल्या कृपाप्रसादानेच गीतेचा पूर्वार्ध मी विनोदपूर्णतेने ओवीबद्ध कथन केला. पहिल्या अध्यायात अर्जुनाचा खेद, दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग (ज्ञानयोग आणि बुद्धियोग नीट विभागून) सांगितला. तिसऱ्या अध्यायात कर्माची थोरवी विशद केली. चौथ्या अध्यायात त्याच कर्माचे ज्ञानासकट प्रकटीकरण केले. त्यातच जे योगतत्व उचितपणे सामावले आहे, ते मी पाचव्या अध्यायात सूचित केले. तेच ते योगतत्व ज्या स्थितीच्या योगाने जीव-शिव एक होतात ती योगस्थिति मी सहाव्या अध्यायात अष्टांगांसहित विवरून दाखवली. त्याशिवाय योगभ्रष्ट साधकाला कोणती गती प्राप्त होते, त्याचीही सर्व उपपत्ती सांगितली. सातव्या अध्यायात आधी प्रकृतीची मात स-आदि-अंत विवरून दाखवली आणि मग उदार भक्तांच्या चारही प्रकारांचे विस्ताराने वर्णन केले. आठव्या अध्यायात आधी सुरवातीला सात प्रश्नांच्या उत्तरांचे विस्ताराने निवेदन केले आणि पुढे प्रयाण-समय म्हणजे मरणकाळाचे वर्णन केले.

कसे आहे बघा. अनेकानेक वेदग्रंथांमधील जो काही अंतर्गत अभिप्राय म्हणजे सार आहे, ते सगळे महाभारतात सामावलेले आहे. आणि त्या वेदांच्या साराचा जो एकूण आशय आहे, तोच कृष्णार्जुन-संवादाच्या गीतेत ओतप्रोत भरलेला आहे. आणि त्या गीतेच्या सातशे श्लोकांमध्ये जो आशय भरला आहे, तोच पूर्ण आशय एकाच नवव्या अध्यायात आलेला आहे. तो अभिप्राय नीट प्रकट करण्याचे धैर्य, हे गुरुराया, मला आपल्या कृपेविना येणे शक्यच नव्हते. आपलीच कृपा ती. मी व्यर्थ गर्व का करू?

अहो, गुळाच्या खड्यात 'राब' (म्हणजे काकवीपेक्षा दाट असलेला गुळाचा भाग) एकच असतो, पण त्यात गूळ व साखर या दोहोंची वेगवेगळी चव समाविष्ट असलेली कळते. तसेच या गीतेच्या अध्यायांचे आहे. (क्रमशः)


मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३