दोन्ही प्रवृत्ती तितक्याच घातक

या प्रकरणात पैसे घेणारे आणि देणारेही संशयित आरोपीच आहेत, त्यामुळे कोणालाही न्याय देण्याचा किंवा सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त असे प्रकार घडू नयेत म्हणून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना एक निष्कर्ष पोलीस काढतील, अशी अपेक्षा आहे.

Story: संपादकीय |
18th November, 11:48 pm
दोन्ही प्रवृत्ती तितक्याच घातक

पूजा नाईक नावाची महिला युवकांना नोकऱ्या देते असे सांगून फसवणूक करत होती. राज्य कर्मचारी भरती आयोग अस्तित्वात येईपर्यंत बरीच वर्षे हा प्रकार सुरू होता, असे पूजा नाईकने केलेल्या विधानांवरून दिसते. २०१९ ते २०२२ दरम्यान एकही काम झाले नाही आणि त्याच दरम्यान आपण १७ कोटींची रक्कम दोन अधिकाऱ्यांना दिली, असे सांगूनही ती मोकळी होते. पूजा नाईक ही स्वतः या प्रकरणात संशयित आरोपी आहे. तिला गेल्या वर्षी अटक झाली होती. एका वर्षानंतर ती पुन्हा प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपण दोन अधिकाऱ्यांना रक्कम दिली होती, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांना २४ तासांची मुदत देते. सहाशेपेक्षा जास्त उमेदवारांकडून आपण पैसे जमवले, असेही ती सांगते. ज्या अधिकाऱ्यांवर ती आरोप करते, त्यातील एकाने तिला नोटीसही बजावली. दुसऱ्या बाजूने तिला पैसे देणारे उमेदवार आता इतक्या वर्षांनंतर आपण फसलो, याची जाणीव झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी करतात. या घटना पाहिल्यानंतर हे एकूण प्रकरण किती निर्भयपणे या सर्वांनी केले होते, याची जाणीव होते. पैसे देऊन नोकऱ्या मिळतात असे समजून एका व्यक्तीकडे लोकांनी लाखो रुपये दिले. जी व्यक्ती सरकारमध्ये कुठल्याच पदावर नाही किंवा ती राजकारणात नाही, मंत्री नाही की आमदार नाही. म्हणजे कुठल्यातरी पदावर असल्यानंतर त्यावर एकवेळ विश्वास ठेवता येईल. किमान थोडीशी आशा तरी दिसली असती. पण सर्वसामान्य महिलेकडे सहाशेपेक्षा जास्त उमेदवारांनी १७ कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली. कोणाचीच भीती न बाळगता तिने मोठ्या प्रमाणात पैसेही जमा केले. आता इतक्या वर्षांनंतर ती स्वतःच आपली फसवणूक झाल्याचे सांगत आहे, हेच एक मोठे आश्चर्य आहे.

नोकऱ्यांसाठी पैसे घेण्याचा जितका मोठा गुन्हा या महिलेने किंवा अन्य संशयित आरोपींनी केला, तितकाच मोठा गुन्हा त्यांच्याकडे पैसे देणाऱ्या लोकांनीही केला आहे. पात्र उमेदवारांना डावलून पैसे दिल्यास आपल्याला नोकरी मिळेल असे समजून पैसे देणाऱ्यांनी आता त्यांचे पैसे बुडाले असे म्हटले म्हणून त्यांना सहानुभूती दाखवणे, म्हणजे त्यांच्या गुन्ह्यात भागीदार होण्यासारखे आहे. ते पीडित नसून तेही तितकेच गुन्हेगार आहेत, जेवढी पूजा नाईक आणि पैसे घेणारे अन्य दलाल गुन्हेगार आहेत. या लोकांनी आर्थिक व्यवहार कसे केले, याचीही चौकशी व्हायला हवी. भविष्यात कोणी असे प्रकार करू नयेत, यासाठी हे प्रकरण एक उदाहरण म्हणून पोलिसांनी सर्वांसमोर ठेवायला हवे. घेणारा आणि देणाराही चौकशीच्या घेऱ्यात यायला हवा. पूजा नाईकने आपण सहाशेपेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली आहे, हे फारच धक्कादायक आहे. यात जे दोन अधिकारी आहेत असा दावा ती करते, त्या अधिकाऱ्यांनी हात वर केले. पूजा नाईककडे कुठलेच पुरावे नसल्यामुळे तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे पोलिसांनाही शक्य नाही. तिच्या म्हणण्यानुसार आपला एक मोबाईल पोलिसांनी घेतला होता, त्यात काही गोष्टी होत्या. अटकेनंतर एका वर्षाने ती हा दावा करत असल्यामुळे तिच्यावर विश्वास कसा आणि किती ठेवायचा, हा प्रश्न आहे. जर तिच्याकडे पुरावे नसतील आणि पूजा नाईक आपला बचाव करण्यासाठी संपूर्ण दोष जर दुसऱ्यांवर ढकलत असेल, तर या प्रकरणाच्या तपासाला काहीच अर्थ राहणार नाही. कुठल्याच न्यायालयात हे आरोप टिकणारही नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलवर जाण्यासाठी ज्या काळात तिने पैसे घेतले, त्या काळात झालेले आर्थिक व्यवहार, बँक हस्तांतरण किंवा कोणी पैसे बँकेतून काढल्याचे व्यवहार किंवा त्या काळात संशयितांकडून झालेली खरेदी तपासावी लागेल. यामुळे किमान पैशांचा व्यवहार स्पष्ट होऊ शकतो. पण यातून कोणाला थेट आरोपी करण्यासारखे काही सापडणे कठीण आहे. पैसे देणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायला हवी. जर या सर्वांनी आपण पूजा नाईककडेच पैसे दिले असे सांगितले, तर किमान एक गोष्ट स्पष्ट होईल की हे व्यवहार तिनेच केले आहेत. या प्रकरणात पैसे घेणारे आणि देणारेही संशयित आरोपीच आहेत, त्यामुळे कोणालाही न्याय देण्याचा किंवा सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त असे प्रकार घडू नयेत म्हणून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना एक निष्कर्ष पोलीस काढतील, अशी अपेक्षा आहे. संशयित पूजा नाईकला फुकटची प्रसिद्धी देण्यापेक्षा तिची सखोल चौकशी महत्वाची आहे.