
आशिया खंडातील भू-राजकारणात सध्या अभूतपूर्व हालचाल सुरू आहे. चीन आणि जपान हे दोन आर्थिक महासत्तांचे शेजारी देश तैवानच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी केलेल्या कठोर वक्तव्यामुळे चीन प्रचंड संतापला असून, दोन्ही देशांनी एकमेकांना सरळ-सरळ धमक्या देण्याची पातळी गाठली आहे. हा वाद आता केवळ द्विपक्षीय न राहता संपूर्ण आशियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे.
हा तणाव ७ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर आम्ही तैवानच्या मदतीसाठी सैन्य पाठवू. मात्र खळबळ उडाली ती ओसाका येथील चीनचे कौन्सुल जनरल शुए जियान यांच्या ट्विटमुळे. त्यांनी अगदी राजनैतिक मर्यादा विसरून लिहिले की, तैवानच्या प्रकरणात कोण ढवळाढवळ करेल, त्याची मान छाटली जाईल.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना बोलावून कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद साध्या नागरिकांवरही उमटू लागले. चीनने आपल्या नागरिकांना जपान टाळण्याचा सल्ला दिला, तर जपानने चीनमध्ये असलेल्या नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले. जपानचे कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी मान्य केले की, चीनमध्ये जपानविरोधी भावना भडकत आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळण्यापासून संशयास्पद लोकांपासून दूर राहण्यापर्यंत अनेक कडक सूचना देण्यात आल्या.
जपान तैवानच्या मुद्द्यावर एवढा आक्रमक का झाला, हा प्रश्न स्वाभाविक आहे. याचे उत्तर भूगोल आणि व्यापार यांच्यात सापडते. तैवान आणि जपानचे अंतर केवळ ११० किलोमीटर. या दरम्यानचा सागरी भाग हा जपानचा महत्त्वाचा व्यापारमार्ग त्यांची जीवनरेखा मानला जातो. तैवानवर चीनने नियंत्रण मिळवले, तर जपानच्या मालवाहतुकीला सरळसरळ धोका निर्माण होईल. त्यातच अमेरिकेचा सर्वात मोठा परदेशी लष्करी तळ जपानमध्ये असल्याने, तैवानवर हल्ला झाला तर जपान या संघर्षात ओढले जाणे अपरिहार्य ठरेल. या सर्व कारणांमुळे तैवानचे स्वतंत्र अस्तित्व हे जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
चीनची विस्तारवादी भूमिका आणि जपानने घेतलेला अनपेक्षित आक्रमक पवित्रा या दोन्ही गोष्टी आगामी काळात परिस्थिती आणखी चिघळवू शकतात. जपानने दशकांपासून चालत आलेला बचावात्मक पवित्रा सोडल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळतात. याचा परिणाम केवळ आशियावर नव्हे, तर जागतिक राजकारणावरही मोठ्या पातळीवर दिसू शकतो.
- सचिन दळवी