म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

Story: अंतरंग- उत्तर गोवा |
2 hours ago
म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचाऱ्यांचे कामकाजाकडे नेहमीच दुर्लक्ष असते. बहुतेक शासकीय कर्मचार्‍यांकडून चांगली सेवा मिळत नाही, असा जनतेमध्ये सूर असतो. सेवा कार्यातून पाठ फिरवण्यासाठी कर्मचारी कोणतेही कारण पुढे करत असतात.

असाच प्रकार हल्लीच म्हापसा नगरपालिकेत घडला. एका लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बहुतेक पालिका कर्मचारी दुपारच्या जेवणाची वेळ होण्यापूर्वीच कामकाज अर्धवट सोडून निघून गेले. एका नगरसेवकाने रिकाम्या पालिका कार्यालयाचा व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केला आणि नगरपालिका प्रशासनावर सडेतोड टीका केली.

त्या व्हिडिओत प्रशासकीय, लेखा, अभियंता, इनव्हर्ड-आऊटवर्ड, जन्म-मृत्यू दाखला विभाग रिकामी दिसत आहेत. कपाटे उघडी होती आणि कागदपत्रे टेबलवरच दिसत आहेत.

विद्यमान म्हापसा पालिका मंडळातील नगरसेवकांना पालिका अधिकारी किंवा कर्मचार्‍यांकडून काडीचीही किंमत मिळत नाही, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक. सत्ताधारी गटातील नगरसेवकांना तर या पालिका मंडळात एकाद्या हाताखालच्या कामगाराप्रमाणे वागणूक दिली जाते. वरिष्ठांकडून जो आदेश आला आहे, त्याचे पालन व्हायलाच हवे, अशी वृत्ती पालिकेत रुजली गेल्यामुळे म्हापशातील नगरसेवकांप्रती असलेला मानसन्मान हा खालावला आहे. त्यामुळे म्हापसा नगरपालिकेच्या कामकाजात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे.

याच कारणामुळे हवे तेव्हा ड्युटीवर रुजू होणे आणि हवे तेव्हा कामकाज सोडून बाहेर जाणे, ही वृत्ती पालिका कर्मचार्‍यांमध्ये बळावली आहे. इतर काही सरकारी खात्यांमध्ये देखील असाच प्रकार सुरू आहे. जत्रोत्सवाच्या वेळी होणार्‍या सत्यनारायण महापूजेच्या जेवणावर ताव मारण्यासाठी जाण्याचा या कर्मचार्‍यांचा कल असतो. सरकारने खाते किंवा कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार्‍या कारवाईचे बडगा उगारल्यास असे कामकाज उघड्यावर टाकून वाढदिवस किंवा इतर सोहळ्यांना हजेरी लावण्याचे कर्मचाऱ्यांचे प्रकार थांबतील.

- उमेश झर्मेकर