
मडगाव : काणकोण येथून प्रवाशाला घेऊन मडगावात आलेल्या रमेश पागी (रा. खोला) यांची कार अडवून त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. तसेच धमकी दिल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित मयूर राणे, सलीम शेख व अब्दुल रहमान यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
काणकोण येथील पर्यटक टॅक्सीचालक व मडगाव परिसरातील टॅक्सीचालकांतील वाद वाढत जात आहे. मडगाव परिसरातून मयूर राणे यांची पर्यटक कार पाळोळे काणकोण येथे गेली होती. त्यावेळी तेथील टॅक्सीचालकांनी राणे यांच्या गाडीवरील चालकाला प्रवाशाला नेण्यास मज्जाव केला. याच रागातून मयूर राणे (रा. शिरवई, केपे), सलीम शेख (रा. कोंब, कुंकळ्ळी) व अब्दुल रहमान (रा. आझादनगर, कालकोंडा) यांनी काणकोण येथून मडगावात प्रवासी घेऊन आलेल्या रमेश पागी यांची पर्यटक कार अडवली. रमेश पागी हे प्रवाशाला सोडून माघारी जात असताना मडगावातील कदंब बसस्थानकानजीक हा प्रकार घडला. संशयितांनी सुमारे २० मिनिटे पर्यटक कारच्या समोर दुचाकी घालून अडवून ठेवली. याशिवाय प्रवाशाच्या वाहतुकीप्रकरणातून धमकीही दिली. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांत रमेश पागी यांनी केलेल्या तक्रारीनुसार तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, याच पर्यटन टॅक्सी वादातून मंगळवारी रात्री फातोर्डा पोलीस ठाण्यावर टॅक्सीचालकांनी गर्दी केली होती. तसेच मयूर राणे यांनीही काणकोणातील घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली असल्याचे स्पष्ट केले.