चोरीचे सोने विकत घेतल्याचा संशय : म्हापशातील सोनारांकडून कारवाईचा निषेध

म्हापसा : आंध्र प्रदेशमधील एका चोरी प्रकरणातील ३१० ग्रॅम सोन्याचे दागिने संशयिताने म्हापशातील सोनारांना विकल्याच्या कारणावरून हैदराबाद पोलिसांनी दोघा स्थानिक सोनारांची चौकशी केली. तसेच आंध्र प्रदेश पोलिसांनी संबंधित सोनारांना नोटीस बजावत २६ नोव्हेंबर रोजी पोलीस स्थानकात हजर राहण्याची सूचना केली.
म्हापशातील सराफ व्यावसायिकांनी हा प्रकार समजताच म्हापसा पोलीस स्थानकात गर्दी करीत कारवाईला आक्षेप घेतला. हैदराबाद (आंध्र प्रदेश) पोलिसांना एका चोरी प्रकरणी अटक केलेल्या संशयिताने आपण चोरीतील दागिने म्हापसा येथील दोन सराफी दुकानात विकल्याचा जबाब दिला होता. त्यानुसार, शुक्रवार २१ रोजी सकाळी संशयिताला घेऊन आंध्रप्रदेश पोलीस म्हापशात दाखल झाले. पोलिसांना एक सराफी दुकान बंद आढळले. तर, दुसऱ्या दुकानात महिला मालक होती. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. नंतर दुकान मालक दुकानात आले. त्यांनी साध्या वेषातील पोलिसांकडे ओळखपत्र मागितले. मात्र, त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला.
हा प्रकार सुवर्णकार कारागिरांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरण हाताबाहेर जाताच, त्यांनी म्हापसा पोलिसांना मदतीला बोलावले. नंतर त्यांना म्हापसा पोलीस स्थानकात आणले. तिथे पोलीस अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेश पोलीस आणि सोनारांची समजूत घातली. नंतर पोलिसांनी संबंधित सोनारांना हजर राहण्याची रितसर नोटीस दिली.
स्थानिक सोनाराला बाहेरील राज्यातील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती शहरात पसरताच इतर सोनारांनी म्हापसा पोलीस स्थानकात एकच गर्दी केले. आंध्र प्रदेश पोलिसांच्या कृतीचा निषेध केला. यापूर्वी राज्यातील सोनारांना ताब्यात घेणे किंवा चौकशी करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कल्पना किंवा मदत घेण्याचा निर्णय झाला होता. तरीही परस्पररित्या हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईला सोनारांनी हरकत घेतली.
आम्हाला नेहमीच पोलिसांकडून सॉफ्ट टार्गेट केले जाते. खोटे व बिनबुडाचे आरोप केले जातात. चोरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो, मात्र आमचे कुणीच ऐकून घेत नाहीत, असे सुवर्णकार कारागिर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.