गोडवा

ती ताई; तिचं नाव, गाव, पत्ता काहीच माहित नाही; पण तिचं हसणं, तिच्या बोलण्यातला गोड सूर, तिच्या डोळ्यांतली आत्मीयता हे सगळं इतकं भावलं की जणू एखादी जुनी ओळखीची व्यक्ती भेटली. ती ज्या प्रेमाने सरबत बनवत होती, त्या प्रत्येक हालचालीत तिचं मन ओतलं गेलं होतं.

Story: मनातलं |
58 mins ago
गोडवा

कधी कधी जीवनात काही प्रसंग इतके साधे, पण मनाला भिडणारे असतात की ते कायमचे स्मरणात राहतात. असाच एक प्रसंग आम्हाला परवा गिरी-म्हापसा येथे अनुभवायला मिळाला. साधं लिंबू सरबत प्यायचं म्हणून एका छोट्याशा गाड्यावर थांबलो, पण त्या क्षणाने आम्हाला ‘गोडवा’ या शब्दाचा खरा अर्थ शिकवला.

ती ताई; तिचं नाव, गाव, पत्ता काहीच माहित नाही; पण तिचं हसणं, तिच्या बोलण्यातला गोड सूर, तिच्या डोळ्यांतली आत्मीयता हे सगळं इतकं भावलं की जणू एखादी जुनी ओळखीची व्यक्ती भेटली. ती ज्या प्रेमाने सरबत बनवत होती, त्या प्रत्येक हालचालीत तिचं मन ओतलं गेलं होतं. आणि जेव्हा सरबत मिळालं, पहिला घोट घेताच जाणवलं अरेरे! हे तर फारच खारट आहे! पण त्याच क्षणी तिच्या त्या मनमोकळ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. काही न बोलता, गपचूप ते सरबत प्यायलो. कारण त्या सरबतातलं “मीठ” जास्त होतं, पण तिच्या स्वभावातला ‘गोडवा’ त्याहून अधिक होता.

आजच्या यांत्रिक जगात, जिथं माणसं हसणं विसरली आहेत, तिथं त्या ताईंचं ते हसू म्हणजे एखादं औषधच वाटलं. त्यांच्या स्वभावात एक साधेपणा होता पण तोच त्यांचा सर्वात मोठा अलंकार. कुणालाही ओळखत नसतानाही त्या ज्या आपुलकीने वागल्या, तीच खरी श्रीमंती होती. तिच्या वागण्यात दिखावा नव्हता, कृत्रिमता नव्हती. फक्त एक निरागस हसू, आत्मीयतेने ओथंबलेला संवाद, आणि प्रत्येक ग्राहकाची केलेली सेवा. आजच्या काळात ही गोष्ट दुर्मिळच म्हणावी लागेल.

खरं सांगायचं तर त्या सरबतातल्या मीठाने आमच्या ओठांवर खारटपणा आणला असेल, पण तिच्या स्वभावाच्या गोडव्याने आमच्या मनात एक मधुर चव निर्माण केली. त्या एका अनुभवाने जाणवलं पदार्थ गोड असण्यापेक्षा, तो बनवणाऱ्याचं मन गोड असणं अधिक महत्त्वाचं असतं. जर आम्ही तिला सांगितलं असतं की सरबत खारट झालंय, तर तिने नक्कीच हसत हसत साखर आणली असती, नव्याने सरबत बनवलंही असतं. पण आम्हाला तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्याची गोडी कायम ठेवायची होती. कारण तिचा आनंद तोच तिचा सर्वात सुंदर अलंकार होता.

त्या एका छोट्याशा भेटीतून आम्ही मोठा धडा शिकलो माणसाचा स्वभावच त्याचं खरं सौंदर्य आहे. गोड बोलणं, मनापासून वागणं, आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच खरी देवता. त्या ताईंच्या रूपाने आमच्यासमोर आली होती. आजही जेव्हा त्या प्रसंगाची आठवण येते, तेव्हा लिंबू सरबताची चव नाही, पण तिच्या स्वभावाचा गोडवा जिभेवर रेंगाळतो. तिचं ते साधं जीवन, पण त्यातली आनंदाची श्रीमंती हाच खरा प्रेरणादायी संदेश आहे.

त्या ताईला आम्ही नावाने ओळखत नाही, पण तिचं हसणं आम्हाला कायम लक्षात राहील. कारण खरा गोडवा साखरेत नसतो, तो माणसाच्या स्वभावात असतो. आणि म्हणूनच त्या ताईंसाठी मनापासून शुभेच्छा.

त्या अशाच हसऱ्या चेहऱ्याने, प्रेमळ हृदयाने, आनंदाने आणि गोडव्यानं न्हालेल्या जीवनाने जगत राहोत..


परेश नाईक
मांद्रे गोवा