गावाच्या वेशीवरील एका मोठ्या सुरंगीच्या झाडाजवळ जाण्याचा प्रयत्न करताच, आईने मला कडक शब्दात अडवले. त्या जमिनीवर गावच्या क्रूर जमिनदाराचे भूत आहे, ही आजीने सांगितलेली कथा माझ्या मनात घर करून गेली.

एकदा मी व आई गावाच्या वेशीवरून येत असताना उजवीकडे असलेल्या मोठ्या सुरंगीच्या झाडावर जाऊन थोडी सुंरगे काढून छान वळेसार करून वेणीत माळणार या आशेने, मी पटकन त्या दिशेने वळले. आई माझ्या पाठीमागे धावत आली व माझा हात घट्ट पकडला. तिने मला त्या झाडापाशी व जमिनीवर कधीच पाऊल ठेवू नकोस अशी ताकीद दिली. मला गप्प राहून घरी यायला सांगितले. मी आईला “का तू मला अडवलेस?” असे विचारले. तर ती मला सांगू लागली, “त्या जमिनीत जमीन मालकाचे भूत आहे. ते तिथे जाणाऱ्याला पछाडणार. म्हणून तिथे कुणीही जात नाहीत." त्यावर माझा मोर्चा आजीकडे वळला. मी घडलेला प्रकार आजींना सांगितला. भूत? मालक कोण? का जायचे नाही? असे हजार प्रश्न मी आजींना केले.
आजीने मला मालकांची संपूर्ण कथाच सांगितली. जेव्हा आजी लग्न करून आलेली, तेव्हा दुसऱ्याच दिवशी आजी व आजोबा म्हणे मालकांच्या भेटीस गेलेले. गावाच्या प्रथेप्रमाणे कुणाचेही लग्न झाले की ते दुसऱ्या दिवशी मालकांच्या भेटीस जायचे. मालक म्हणजे गावाचे मोठे जमीनदार. गावातल्या जास्तश्या वडिलोपार्जित संपत्ती, जमिनी आणि खानदानी राजाप्रमाणे राहणीमान असलेले श्रीमंत घराण्यातील एकुलते एक पुत्र राजाराम मालक.
आजी भूतकाळात जणू पोहोचली होती. आठवण काढीत ती सांगू लागली, “लोभ, मत्सर, प्रेम, माणसांकडून काय काय करून घेईल याची कधीच खात्री नाही बरं! एखादा माणूस जेव्हा वेड्यासारखी कशावर लोभ करतो व अति प्रेम करतो, त्याचा अंत अति भयंकर होतो. म्हटलेच आहे ना, ‘अति तिथे माती’. राजाराम हे आमचे मालक. राजारामचे आपल्या शेतीवर, कुळागारांवर, मुख्य म्हणजे जमिनीवर खूप प्रेम होते. तो कुणालाही आपल्या जमिनीवर फिरकू देत नसे. आपण समोर उभे राहून ते शेत-कुळागरांचे काम करून घेत. आपल्या देखरेखेखाली नडणी ते ते मळणीपर्यंत पिकांचे काम पाही.
राजाराम आपल्याकडील पैसे व्याजानेही देत असे. लोक आपल्या जमिनी, दागिने गहाण ठेवून राजाराम मालकांकडून पैसे घेऊन जात. म्हणूनच त्यांना ‘मालक’ असे नाव पडले होते. राजारामांची आई-वडिल तो विशीत पोहोचताच देवाघरी गेले होते. मोठ्या वाड्यात ते एकटेच राहत असत. त्यांच्या बरोबर फक्त एक नोकर व एक मुन्शी हिशोबासाठी असत. दोघेही त्यांची चापलूसी करत. जर कोणी कर्जदार व्याज किंवा रोख परतफेड करण्यास चुकला, राजाराम मालक दुप्पट व्याज लावीत. किंवा बळजबरीने त्यांचा अंगठा लावून जमीनच बळकावित असे. अशाप्रकारे त्याने गावातील अनेक सुपीक जमिनी बळकावल्या होत्या. तो आपल्या जमिनीवर संध्याकाळी न चुकता फेरी मारत असे. अशाप्रकारे त्याचे जमीन-वेड दिवसेंदिवस वाढतच होते.
राजाराम दिसायला एका राजबिंड्या पुरुषाप्रमाणे होता. त्याला तारुण्यात अनेक लग्नाची स्थळे आली होती. पण आपल्या अहंकारी व हेकेखोर स्वभावामुळे त्यानेच ती स्थळे घालवलेली असत. राजाराम नेहमी पांढरे धोतर, पांढरा शुभ्र सदरा, तेल लावून टापटीप विंचरलेले केस जसा जुन्या जमान्यातील नायकच. फक्त राजारामला पान खायला आवडत असल्यामुळे त्यांचे सगळे दात लालेलाल असायचे. पान सोडून दुसरा कुठलाही छंद राजारामला नव्हता. राजाराम मालक लग्न न करण्याचे कारणसुद्धा कदाचित आपले जमिनीवरील प्रेम दुभंगले जाऊ नये म्हणूनच
असेल.
रोज सकाळी राजाराम मालक एकटाच देवळात चालत जाई. संपूर्ण धवल वस्त्रात, हातात तांबडे एकच फुल घेऊन भल्या पहाटे राजाराम एका भूताप्रमाणे चालत असे. घरी येऊन तो कडक कोरा चहा व दोनच भाकऱ्या असा नाश्ता करायचा व नंतरच कामाकडे वळायचा. अंगाखांद्याने जणू तो राजबिंडा राजपुरुष. राजारामाच्या घरासमोर म्हणजेच गावच्या वेशीवर मोठे सुरंगीचे झाड होते. सुरंगी फुलल्यावर खूपशा बायका तिथे फुले वेचायला यायच्या. पण राजाराम मालक त्यांना मोठ्याने ओरडून घालवून लावायचा. राजारामाकडे कामाला येणारी माणसे त्याला घाबरायची. कारण त्याच्या हातात नेहमी एक चाबुक असायचे. कोणीही जास्त बोलल्यास चाबुकाचा पट्टा फट् फट् करीत त्यांच्या अंगावर चाबकाचे चट्टे काढण्याची ताकद मालकात होती. संध्याकाळी आपल्या जमिनीवर फेरफटका मारताना, कोणी काही चोरी केले असे कळल्यास त्याला खूप राग यायचा. चोर सापडल्यास तर त्याला चाबकाने फोडून काढायचा. राजाराम विनाकारण आपल्या जमिनीवर कोणालाही पाऊलसुद्धा ठेवू देत नसे.
एक दिवस राजारामचे लक्ष त्याच्याच मुन्शीच्या मुलीवर पडले. ती म्हणे सुरंगे वेचायला आली होती. राजारामने तिचा घात करण्याचा प्रयत्न केला. मुन्शीला हे सहन झाले नाही. सगळ्यात जवळ असलेल्या मुन्शीनेच पाठीत सुरा खुपसला व रातोरात राजारामला मारून पळून गेला. तो सापडलाच नाही. काही लोक सांगतात मुन्शीने मालमत्तेच्या हव्यासापोटी राजारामला मारले, तर काही सांगतात मुलीच्या अब्रूसाठी. मात्र एक गावात चाललेला अत्याचार थांबला. त्याच वेळीपासून रात्रीचा तो लोभी, तांबड्या दातखळीचा खुळा, जमीन वेडा, सुरंगीचा मालक लोकांना आत्म्याच्या रूपात दिसू लागला. दुपारचा पण घाबरवू लागला. म्हणूनच आईने तुला त्या सुरंगीकडे जाऊ नकोस म्हणून सांगितले. मालकाच्या आत्म्याला शांती लाभलीच नाही, कारण फक्त लोभ होता. म्हणून बाई, लोभ कशाचाही करू नये. मोह सोडून द्यावा. सुरंगीचासुद्धा मोह सोडूनच द्यावा. म्हणून कानाला पीळ घाल आणि कधीही वेशीवर जाऊ नकोस.”

श्रुती करण परब