आनंदाश्रूंनी ओथंबलेलं आयुष्य

सुरेखा पार्सेकर, एक तेजस्वी स्त्री, जिच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे आली. अनेक वेदनांवर मात करून तिने आपल्या मुलीला सुखी केले. तिच्या संघर्षाची आणि विजयाची ही कहाणी तिच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी आनंदाश्रूंनी ओथंबून वाहणारी आहे.

Story: लेखणी |
14th November, 10:53 pm
आनंदाश्रूंनी ओथंबलेलं आयुष्य

आज तिच्यासाठी अगदीच आनंदाचा दिवस होता. तिच्या पोटच्या मुलीचं लग्न होतं. आनंदाश्रू घळाघळा डोळ्यांतून वाहत होते. काही क्षणांसाठी तिचं मन सुन्न झालं... मागचा सगळा काळ तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला.

तिचं नाव होतं सुरेखा पार्सेकर, सावंतवाडीतील माणगाव हे तिचं गाव. नखशिखांत नटलेलं यौवन, गोरा वर्ण, सुडौल शरीर. तिचं रूप एखाद्या नटीलाही लाजवेल असं होतं. ती बी.एस्सी. (भौतिकशास्त्र)च्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. वय अवघं १९ वर्षे. दोन भावांपाठची ती लाडकी धाकटी, आई-बाबा आणि भावांसोबत सुखी संसार.

ती सावंतवाडीच्या नामांकित कॉलेजात शिकत होती. रोज बसने प्रवास असायचा. आई-बाबांनी तिच्यावर कुठलंही बंधन घातलं नव्हतं “बाळा, तू हवं तेवढं शिक, स्वतःच्या पायावर उभी रहा. मग तुला आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही” असं बाबा वारंवार सांगायचे.

त्या बसमध्ये असलेला कंडक्टर श्रीकांत पाटील विवाहित होता आणि दोन गोंडस मुलांचा बाप होता. पण सुरेखाचं सौंदर्य पाहून तो तिच्यावर भाळला. रोज तिचा चेहरा पाहून त्याच्या मनाचा बांध सुटायचा. शेवटी एका दिवशी, प्रवासी कमी असताना, त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या “सुरेखा, तू एवढी सुंदर आहेस की ज्या दिवसापासून तू बसने प्रवास करतेस, त्या दिवसापासून मला तू आवडतेस. पण कधी हिम्मत झाली नाही सांगायला... आज कोणी नाही आहे म्हणून सांगतो. मला तू खूप आवडतेस. माझ्याशी लग्न करशील का?”

लग्न झालेला असला तरी त्याचं वागणं इतकं प्रेमळ होतं की सुरेखाला वाटलं तो अविवाहित आहे. हळूहळू तीही त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. बी.एस्सी.ची शेवटची परीक्षा झाल्यावर श्रीकांत म्हणाला “सुरेखा, तुझ्या आई-बाबा मला कधीही स्वीकारणार नाहीत. मी एक साधा कंडक्टर आहे. आपण पळून जाऊन लग्न करूया. नंतर वेळ मिळाला की परत येऊ, आई-बाबांना भेटायला.”

सुरेखाने क्षणाचाही विचार न करता त्याच्याबरोबर मुंबई गाठली. तिथे त्यांनी संसार थाटला. ती समाधानी होती. सुखाचा संसार, प्रेमळ नवरा. काही महिन्यांनी तिला मुलगी झाली. नाव ठेवलं योगिता.

पण सत्य फार काळ लपवता आलं नाही. पहिल्या बायकोला संशय आला. पोलिसांच्या मदतीने श्रीकांतला गाठलं. सर्व सत्य बाहेर आलं. सुरेखा हादरली. “असं का केलं तू माझ्याबरोबर? तू लग्न झालेला असताना माझं आयुष्य उद्ध्वस्त का केलं? काय मिळालं तुला हे सगळं करून? आता काय करू मी? जीव द्यायचा विचार मनात येतोय, पण ही चिमुकली पदरात आहे... आता सांग, गप्प का झालास?”

पहिली बायकोही संतापाने म्हणाली, “मला नोकरीसाठी जातो म्हणत तू इथे आलीस आणि दुसरं लग्न केलं! काय मिळालं तुला माझं आणि माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करून? बोला ना, बोला!”

त्या क्षणी श्रीकांत मानसिकदृष्ट्या कोसळला. भरधाव रेल्वेसमोर उभा राहिला... आणि क्षणात सगळं संपलं. घरात आक्रोश माजला. दोन्ही स्त्रिया नि:शब्द.

सुरेखा निपचित बसली होती, सहा महिन्यांच्या मुलीला कवटाळून. तिच्या आई-बाबांना जेव्हा हे कळालं, त्यांनी मुलीचा आणि नातीचा विचार करून तिला पुन्हा घरी आणलं.

काळ पुढे सरकत गेला. योगिता दोन वर्षांची झाली. सुरेखाने धैर्य गोळा करून नर्सिंग कोर्स केला आणि एका खासगी रुग्णालयात नोकरी धरली. आई-बाबा, भाऊ मदत करत होते, पण कायमचं ओझं त्यांच्यावर नको म्हणून तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार सुरू झाला.

कुडाळ येथील विधुर रावजी पाटील याच्याशी तिचं लग्न ठरलं. संसार पुन्हा सुरू झाला. पण नियतीने पुन्हा घाला घातला. काही वर्षांनी अपघातात रावजीचं निधन झालं.

सुरेखाने मात्र धैर्य सोडलं नाही. तिने सगळी ताकद योगितेच्या शिक्षणात ओतली. योगिता हुशार होती. तिने बी.एस्सी. नर्सिंग पूर्ण करून परिचारिका म्हणून नोकरी मिळवली. काही वर्षांनी तिचं लग्न एका वकिलाशी ठरलं. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रेमळ.

आज त्या योगितेचं लग्न होतं. आई सुरेखा (आता सारिका) तिच्या लग्न मंडपात बसून आठवणींच्या समुद्रात हरवली होती... तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घळाघळा वाहत होते. आयुष्याने दिलेल्या प्रत्येक वेदनेवर मात करून, मुलीचं सुख पाहून तिचा आत्मा समाधानाने भरून आला होता....


- सौ. गौरी रोशन वेर्लेकर