प्रत्येक गावात, वस्तीत एक असा परोपकारी माणूस असतो, ज्याचे रक्ताचे नाते नसले तरी तो गरजेच्या वेळी मदतीला धावून येतो. मुंबईतील अशाच एका निस्वार्थ, हौशी कार्यकर्त्याचे म्हणजेच आमच्या दामुमामाचे हे मनमोहक शब्दचित्र.

आमच्याकडे बघा, प्रत्येक गावात, वाडीवर, शहरात असलात तर जवळच्या परिसरात असा एक तरी परोपकारी हौशी कलाकार असतो, जो प्रत्येक प्रसंगात, अडीअडचणीत आपल्याबरोबर असतो, अगदी निर्व्याज मनाने, कसलीही अपेक्षा न ठेवता. खरे तर त्याच्याशी आपले रक्ताचे नाते नसतेच मुळी, पण आपल्या गरजेला तो रक्ताच्या नात्यापेक्षा महत्त्वाचा ठरतो.
आमचा दामुमामा हा असाच, अगदी ह्याच पठडीतला. चाळीत, गल्लीत कोणाकडे, कुठेही कसलाही कार्यक्रम असो, बरा-वाईट प्रसंग असो, दामुमामा हजर, अगदी बिनबुलाया मेहमान, पण स्वार्थासाठी नाही हो! आमच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळेस पहिली ओळख झाली आमची. मी गावची. मुंबईत तसे फारसे नातेवाईक नाहीत माझे. आणि आमच्याकडे त्याकाळी अशी रीत होती की शक्यतो अशा समारंभात मुलीकडचे लोक जास्त धावपळ करीत. आधीच रिसेप्शन हा प्रकार मला तसा नवीनच. आमच्याकडे लग्नातच सगळे विधी झाले की भेटाभेट होत असे आप्तजनांची. पण इथे लग्न गावी आणि स्वागत समारंभ मुंबईत. जरा टेन्शनमध्येच मी. ह्यांना विचारलं तर म्हणाले, “डोन्ट वरी, दामूमामाने केलीय सगळी अरेंजमेंट". आता हा दामूमामा कोण? स्वागत समारंभाच्या आदल्या संध्याकाळी हाफ पँट, टी शर्ट, थोडी दाढी वाढलेली आणि कपाळावर गल्लीतल्या मारुती मंदिरातील भटाने लावलेला भगवा टिळा, अशा अगदी कट्टर शिवसैनिकांच्या आविर्भावात आमच्या घरात एंट्री झाली साहेबांची. आणि वातावरणच बदलले आमच्या घरातले. माझे दिर, आमचे हे सगळे खूश.
दामुमामाने स्वतः खुर्ची घेतली आणि सासूबाईंना फर्मान सोडले चहाचे. मग मोर्चा वळला आमच्याकडे, “नमस्कार गोवेकर, कसे आहात?", अगदी दणकट आवाजात ओळख. आणि तीच ओळख आजपर्यंत टिकली आमची. रिसेप्शनमध्ये हॉल, कॅटरिंग सगळी सेटिंग 'व्हाया दामू मामा'. अगदी हॉलवर जाण्यासाठी फर्नांडिस अंकलची गाडीसुद्धा ‘बाय दामूमामा!’.
एक झलक दिली मी दामूमामा काय चीज होते त्याची. खरंच कुठलेही काम असो, कोणताही प्रसंग असो, तोडगा दामूमामाकडे असतोच. ‘नाही' हा प्रकारच नाही. भयंकर आत्मविश्वास. तर जशी दामू मामाची ओळख होत गेली, तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्वही समजू लागले. आमच्या बाजूच्याच चाळीत जिन्याखालच्या छोट्या खोलीत संसार त्याचा. अर्थात तेव्हा आई होती म्हणा सांभाळायला. लेकरू हे असे, फक्त आणि फक्त समाजसेवा डोक्यात भरलेली. जणू प्रत्येकाच्या टेन्शनचा भार हाच वाहतोय, अशी. बापाने मरतेसमयी थोडी पुंजी बँकेत ठेवली होती, त्यावर आणि तुटपुंज्या पेन्शनवरच घर चाले त्यांचे. दामूमामाला तसे काम ना धाम. एकटा मुलगा, शिक्षण मॅट्रिक फेल. तशी दोन-चार ठिकाणी नोकरी लागली म्हणा, पण ती तेवढीच. सकाळी अपॉइंटमेंट लेटर, तर संध्याकाळी रिझाइन लेटर. अर्थात नसानसात परोपकार भरलेल्या दामुमामाला त्याची फिकीरही नसे. सकाळी अर्धा कप चहा पिऊन घराबाहेर पडलेला पोर जेवायलासुद्धा येईल की नाही याची शाश्वती नसे. त्याच्या असल्या स्वभावावर खूप चिडायची आई त्याची. बापाविना पोर. त्याला काहीतरी कामधंदा असावा, लग्न करावे त्याने, असे तिला वाटणारच ना! पण दुसऱ्याचे भले करण्याचे व्यसन असलेल्या दामुला त्याची फिकीरही नव्हती कधी आणि आजही नाही आहे.
एक मात्र नक्की. आपण जरी कमावता नसलो तरी गल्लीतल्या गरजू मुलाला नोकरी शोधण्यात दामू मामा अग्रेसर. मागे एकदा आमच्या गल्लीत नवीनच राहण्यास आलेल्या पालिका अधिकाऱ्याच्या मुलाला माझ्या ओळखीने शाळेत ऍडमिशन मिळवून दिली आणि त्या बदल्यात चाळीतल्या तात्या पवारच्या मुलाला पालिकेत चिकटवून दिला, रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून आणि आता तोच ड्रायव्हर पन्नास हजार पगार कमावतो आणि रोज बायकोला चौपाटीवर घेऊन जातो. आणि आमचा दामूमामा नाक्यावर पानवाल्याकडे बसून फकाणा मारतो. मी त्याला विचारले तर म्हणतो कसा, “गोवेकर, माझ्या पत्रिकेत लिहिलेय की मी आज ना उद्या खूप मोठा माणूस होणार, पण काय आहे, सध्या साडेसाती चालू आहे ना, म्हणून". आता हे मला सांगून पंधरा वर्षे झाली, पण दामू मामाची साडेसाती अजून संपली नाही.
अर्थात प्रापंचिक जमा-खर्चात शून्य असलेला दामू मामा लोकसंचयाच्या कमाईत मात्र खूप श्रीमंत आहे, हो! गल्लीत काय, अख्ख्या एरियात कुठेही जा, दामू मामाला ओळखत नाही असे कोणीही नाही. अगदी आमचा नगरसेवकही कितीही बिझी असला तरी दामू मामा भेटल्यास त्याची विचारपूस करतोच. गल्लीत अगदी प्रत्येक घरावर उपकार आहेतच त्याचे. आमच्यासमोरचे जोशीकाका जेव्हा खूप दारू पिऊन भेलकांडत घरी यायला निघायचे, त्या वेळेस कित्येकदा दामूमामाने सांभाळून आणले त्यांना घरी. आता जोशीकाका सुधारले, पण त्यांच्या पत्नी अजूनही राखी बांधतात दामूमामाला. गणपतीच्या सुमारास दामूमामा मंडपात बिझी होता आणि त्याच्या आईची तब्येत बिघडली, तर तात्या पवारच्या मुलाने दामूला बोलाविण्यात वेळ न दवडता आपल्या रुग्णवाहिकेने तिला पालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जीव वाचला तिचा. दामूचा परोपकार अजून पाहायला मिळतो. माझ्या मते हीच खरी दामू मामाची संपत्ती होय. खरं सांगू, अशा लोकांना कधीच कसलीच ददात पडू नये, कधीच कसलाच वाईट प्रसंग येऊ नये त्यांच्यावर. कारण त्यांचे वाईट झाले तर आपले कसे होणार हो? ही चिंता...

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.