एसटीतील एका प्रवासाने चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी शाळेत जाताना अनुभवलेला, गरम भज्यांचा तो सुगंध आणि गावातले 'सदूचे हॉटेल' भूतकाळात घेऊन गेले.

परवाच मी माझ्या माहेरी म्हणजे दाभाळीला गेले होते, अर्थात बसनेच. नेहमीप्रमाणे माझ्या माहेरी जायच्या वेळेसच ह्यांना काहीतरी काम येतेच; त्यामुळे गाडी त्यांच्याकडे आणि आमच्या नशिबात बस. असो! पण खरे सांगू तो बस प्रवास खरेच बरा. कोण ना कोणतरी ओळखीचा भेटतोच. मग सुरू होतात गप्पा. आत्ताच्या, पूर्वीच्या. बस प्रवास जेमतेम तासभरचा, पण आठवणींचे जे भेंडोळी उघडत जातात ना, खरंच सांगते, आठवडा सहज जातो. आजही अगदी तसेच झाले. बसमध्ये जेमतेम बसले आणि समोर लक्ष गेले एका छोट्या हॉटेलकडे. बाहेर शोकेसमध्ये भजी, सामोसा, वगैरे; आत छोटा काउंटर आणि अगदी गाव स्टाइल बाकडे आणि लांब टेबल बसायला. झाले, डोक्यातील आठवणींचा भुंगा परत फेर धरू लागला. त्यात पावसाळी कुंद हवा आणि हलकासा गरम गरम भज्यांचा सुगंध अगदी हवा हवासा वाटणारा, ओळखीचा. त्या सुगंधाने पार भूतकाळात नेले मला, अगदी चाळीस वर्षे आधी.
त्या काळी स्कूल बसचे लाड नव्हते, त्यामुळे दोन किलोमीटरची शाळा आम्ही चालतच गाठायचो. वाटेतल्या बसस्टँडजवळून जाताना भज्यांचा तोच चिरपरिचित सुगंध यायचा. क्षणभर तिथे रेंगाळून तो सुवास नाकात भरून घेताना खूप वाटायचं की आत जाऊन खावं; पण ते सुख तेव्हा नशिबात नव्हतं. एकतर खेडेगावातली रीत आणि त्यात आमच्या आजीची कडक शिस्त! अहो, जिथे शेजाऱ्यांनी दिलेला लाडू सुद्धा खायची परवानगी नव्हती, तिथे हॉटेलात काय जाणार?
आमच्या त्या लहानशा गावातल्या बसस्टँडवर एकच हॉटेल होतं - ‘श्री वज्रदेही हनुमान उपहारगृह’. पण त्या बोजड नावापेक्षा ते ‘सदूचे हॉटेल’ म्हणूनच ओळखलं जाई. हॉटेलचा मालक, आचारी आणि कॅशियर सगळं काही सदूच. मारुतीच्या देवळाजवळ राहणारा सदू, सतत तेलासमोर बसून रापलेला वर्ण, अंगावर हाफ पँट आणि खांद्यावर नॅपकिन अशा साध्या वेशात तो वावरे. त्याची आई देवळात सेवा करून घरखर्च भागवायची. सदूचे वडील दारूच्या पायी लवकर गेले. घरात एक खट आजी होती. गोधड्या आणि मल्ल विणण्यात तिचा हातखंडा. हॉटेल सुरू करण्याआधी सदू तिला तासनतास मदत करायचा. तसा तो गरीब, कोणाच्या अध्यात ना मध्यात. पण अशा बेकारीमुळे आजीला काळजी सतावत होती, की हाताला काम नसलेल्या पोराला पोरगी कोण देणार?
शेवटी आजीने निर्णय घेतला आणि पोराला त्याच्या बापाच्या मित्राकडे आचाऱ्याचे काम शिकायला पाठवले . आईचा विरोध होता त्याला . नवऱ्याची झालेली बरबादी तिने पाहिली होती. पण शेवटी 'पापी पोट’ म्हणतात ना! सदू जवळजवळ दोन वर्षे शहरात होता. अधून मधून यायचा घरी. पण व्यवस्थित राहिला आणि त्याला कारण त्याची आजी. करता करता वर्षे गेली. आई म्हातारी झाली आणि आजीची 'अर्धी लाकडे मसणात' अशी परिस्थिती झाली. शेवटी पोराचे लगीन काढले म्हातारीने. पार म्हापशापर्यंत फिरली आणि शोधून आणली एकदाची मथुरा. म्हणजे नाव हो तिचे. आता एक पंचाईत झाली, ती अशी की शहरात सदू हॉटेलातच राहत होता, जिथे काम करतो तिथे. आता बायकोला कुठे नेणार? त्यातून बायको जरा दीडशहाणी. घरात पटवून घेणारी नव्हती. सदू तिला तिच्या मागे 'मथुरा नाही मंथरा' बोलत असे.
शेवटी सदूने शहरातील काम सोडले आणि परत आला गावात. अर्थात् आता तो पूर्वीचा मल्ल वळणारा सदू नव्हता, तर लग्न समारंभात जेवण बनवणारा आचारी झाला होता. कमाई होत होती, पण ती लग्नाच्या मोसमातच. एरवी मारा माश्या. अर्थात् गाव-गावच्या जत्रा, फेस्त असायचे. मग कुठे शेंगदाण्याचा धंदा, तर कुठे भजी बनवणे चालू झाले. सदूच्या हाताला तशी चव बरी होती. त्यात 'आपले काम बरे, आपण बरे' असा स्वभाव. नाव होत होते, पण पैसा बक्कळ नव्हता. शेवटी मार्ग कसा काढायचा? मग तो दिला आमच्या सरपंचाने. गाव आता जरा वाढत चालला होता. दुकान होते, आरोग्य केंद्र होते, शाळा झाली. नव्हते ते हॉटेल. लोकांना फावल्या वेळात चकाट्या पिटत बसायला योग्य जागा नव्हती.
सरपंचाच्या पुढाकाराने बाजारात जागा मिळाली आणि ‘श्री वज्रदेही हनुमान उपहारगृह’ थाटले गेले. माडाच्या झापाचे छप्पर, आत लाकडी बाकडे आणि मागच्या बाजूला चूल; एवढ्याच जामानिम्यावर 'सदूचे हॉटेल' सुरू झाले. आईच्या सेवेची पुण्याई आणि सदूच्या हातची चव यामुळे हॉटेल जोरात चालू लागले. पण हिशेबात कच्चा आणि स्वभावाने भिडस्त असलेल्या सदूमुळे धंदा मात्र आतबट्ट्याचा होऊ लागला. उधारी मागायला सदूची जीभ वळत नसे. मग आजीने शक्कल लढवली. घरात सतत कटकट करणाऱ्या सदूच्या बायकोला, मथुरेला गल्ल्यावर बसवायचे ठरले. आजीचा अनुभव कामी आला. मथुरा कजाग असली, तरी पक्की व्यवहारचतुर होती. तिच्या येण्याने उधारी कमी झाली, चार पैसे उरू लागले आणि सदूलाही आपल्या बायकोची खरी किंमत कळली.
आमचा तसा खरा संबंध सदूच्या हॉटेलशी आला, तो आम्ही कॉलेजला गेल्यावर. कॉलेजला बसने जावे लागे. पावसात स्टॅन्डलाशेड नसल्याने सदूच्या हॉटेलच्या वळचणीला उभे राहावे लागे. आणि मग त्यावेळी दोस्ती जमली आमच्या ग्रुपची आणि मथुरेची. बाकी कशीही असो, पण शशी भाटकाराच्या मुलीला, म्हणजे मला, ती खूप चांगले वागवत असे . हॉटेलच्या बाजूला उभे राहिल्यावर मी हळूच रिकामा डबा तिच्या समोर सरकवायची. अर्थात आत दोन रुपये
असायचेच - बाबांकडून हक्काने घेतलेला डेली हफ्ता. सदू स्वतः भजी भरून द्यायचा. डबा पॅक व्हायचा. मग बसमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी पार्टी करायचो. विचार करा - ते दिवस! धावती बस, कोसळणारा पाऊस आणि आम्ही कॉलेज-युवती गरमागरम भजी खातोय! अहाहा! काय ते दिवस आणि काय ती भजी! सगळी सदूची कृपा.
अचानक माझी तंद्री भंगली. 'दाभाळ, दाभाळ' कंडक्टर ओरडत होता. सदूच्या भज्यांच्या नादात कधी दाभाळीला पोहोचले कळलेच नाही. खाली उतरले . सहज लक्ष गेले सदूच्या हॉटेलच्या जागी. आता तिथे हॉटेल नाही, सदूही नाही. त्याचा मुलगा शिकला, पोलीस झाला. आता उरल्या फक्त आठवणी - त्या झोपडीच्या, त्या पावसाच्या आणि त्या उघड्या अंगाने फिरणाऱ्या सदूच्या हातच्या भज्यांच्या...

रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.