गुन्ह्यांच्या तपासात आता बोटांचे ठसे, डीएनए सोबतच निसर्गातील एक दुर्लक्षित घटक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गुन्ह्याचे रहस्य उकलण्यासाठी निसर्गाची ही साधी दिसणारी शेवाळ वनस्पती कशा प्रकारे मदत करते, ते पाहूया.

गुन्ह्यांच्या तपासामध्ये आपल्याला सहसा बोटांचे ठसे, डीएनए चाचणी किंवा सीसीटीव्ही चित्रफीत यांचीच आठवण येते, पण काही वेळा गुन्ह्याचे रहस्य उकलण्यात निसर्ग स्वतः मदतीला येतो. अलीकडे शिकागो येथील फील्ड म्युझियममधील संशोधकांनी दाखवून दिले की अगदी लहान, मऊ हिरव्या शेवाळांसारख्या वनस्पतीही गुन्हे उकलण्यासाठी महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. दगडांवर, भिंतींवर आणि झाडांच्या खोडांवर वाढणारे हे शेवाळ दिसायला साधे असले तरी त्यांच्यामध्ये मोठी वैज्ञानिक माहिती दडलेली असते. फॉरेन्सिक सायन्सेस रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात आणि संपादक स्टेफनी बाऊम यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५० वर्षांतील गुन्ह्यांच्या तपासामध्ये शेवाळ आणि त्याच्याशी संबंधित सूक्ष्म वनस्पतींचा वापर कसा झाला याचे सविस्तर पुनरावलोकन करण्यात आले.
शेवाळ, लिव्हरवर्ट आणि हॉर्नवर्ट या सूक्ष्म वनस्पतींना एकत्रितपणे ब्रायोफायट्स असे म्हटले जाते. या वनस्पतींना मुळे, फुले किंवा बिया नसतात. त्या आपल्या आजूबाजूच्या पृष्ठभागावरून थेट पाणी आणि पोषणद्रव्ये शोषून घेतात, त्यामुळे त्या त्यांच्या परिसरातील बदलांना अतिशय संवेदनशील असतात. प्रत्येक शेवाळ प्रजाती एका विशिष्ट ठिकाणीच वाढते, काही ओलसर सावलीत, काही खडकांवर तर काही आम्लीय मातीमध्ये. त्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी किंवा संशयिताच्या वस्त्रांवर आढळणारे शेवाळ त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारच्या परिसरात वावर केला याचे ठोस संकेत देऊ शकते. अगदी छोटासा शेवाळाचा तुकडा सुद्धा पुरावा म्हणून मोलाचा ठरू शकतो.
अमेरिकेतील मिशिगन राज्यात झालेल्या ‘बेबी केट’ प्रकरणात शेवाळाच्या अभ्यासामुळे पोलिसांना महत्त्वाचे सूत्र मिळाले. आरोपीच्या जोडेवर सापडलेल्या शेवाळाचे नमुने फील्ड म्युझियममधील शास्त्रज्ञांनी तपासले. त्यांनी त्या शेवाळाच्या प्रजाती ओळखून आसपासच्या भागातील शेवाळांच्या रचनेसह तुलना केली. परिणामी तपासाचा परिसर सात काउंटीजवरून फक्त काही चौरस मीटरच्या क्षेत्रात मर्यादित झाला आणि गुन्ह्याच्या ठिकाणाचा मागोवा घेण्यात यश आले. इटलीमध्ये घडलेल्या आणखी एका प्रकरणात, एका महिलेच्या जोडेवर आढळलेले शेवाळ तिने पडण्यापूर्वी चढलेल्या भिंतीवरच्या शेवाळाशी जुळले, त्यामुळे तिचा मृत्यू अपघाती होता की हेतुपुरस्सर हे निश्चित करता आले. शिकागो येथील स्मशानभूमीतील एका गुन्ह्यात देखील शेवाळाचा पुरावा उपयोगी ठरला. एका शवावर वाढलेले विशिष्ट शेवाळ ओळखून वैज्ञानिकांनी मृतदेह किती काळापासून तिथे होता हे अंदाजाने सांगितले.
या उदाहरणांवरून दिसते की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात देखील निसर्गातील साध्या वनस्पती गुन्हे उकलण्यात तितक्याच प्रभावी ठरू शकतात. तरीदेखील शेवाळांचा वापर न्यायवैज्ञानिक शास्त्रात अजूनही कमी प्रमाणात होतो. त्यांची अचूक ओळख करण्यासाठी प्रशिक्षित वनस्पतिशास्त्रज्ञांची गरज असते. तरीही या वनस्पतींचे महत्त्व कमी होत नाही. त्या सर्वत्र आढळतात, लवकर सुकत नाहीत आणि वस्तूंवर दीर्घकाळ टिकतात. प्रकाश, आर्द्रता आणि प्रदूषण यांसारख्या घटकांशी त्यांचा संबंध असल्याने त्या त्यांच्या परिसराची कहाणी सांगतात.
फील्ड म्युझियमच्या संशोधकांचे म्हणणे आहे की पोलिस आणि न्यायवैज्ञानिक अधिकारी यांना शेवाळ ओळखण्याचे प्रशिक्षण दिल्यास या वनस्पतींचा अधिक चांगला वापर होऊ शकेल. फॉरेन्सिक बॉटनी या शास्त्र शाखेत आजवर फुले, बिया किंवा परागकण यांवर जास्त भर दिला जातो, पण या अभ्यासानुसार शेवाळ सुद्धा तितकेच उपयुक्त पुरावे देऊ शकतात. हे संशोधन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञांसाठी नवे दालन उघडते, जिथे पर्यावरण आणि न्यायशास्त्र यांचा संगम घडतो.
एकेकाळी दुर्लक्षित वाटणारे हे शेवाळ आता ‘निसर्गाचे गुप्तहेर’ म्हणून ओळखले जात आहेत. अगदी छोट्या आकाराचे असले तरी त्यांच्या रचनेत आणि टिकाऊपणात मोठे सामर्थ्य दडलेले आहे. ते आपल्याला आठवण करून देतात की निसर्गातील प्रत्येक घटक, कितीही छोटा असो, काही ना काही पुरावा किंवा संदेश घेऊनच येतो. गुन्ह्यांचे रहस्य कधी कधी प्रयोगशाळेतील उपकरणांमध्ये नव्हे तर पायाखाली वाढलेल्या हिरव्या शेवाळात दडलेले असते. शेवाळासारखी ही सूक्ष्म वनस्पती दाखवून देते की निसर्गातील लहानात लहान जीव सुद्धा कधी कधी न्याय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावू शकतो.

- डॉ. सुजाता दाबोळकर