स्त्रियांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती आणि ऑटोइम्यून रोग

प्रतिकारशक्ती म्हणजे शरीराची नैसर्गिक ढाल; पण तीच जेव्हा शरीरावर हल्ला करते, तेव्हा ऑटोइम्यून रोग होतात. हार्मोनल, आनुवंशिक आणि जीवनशैलीच्या कारणांमुळे हे विकार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतात.

Story: आरोग्य |
2 hours ago
स्त्रियांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती आणि ऑटोइम्यून रोग

आपल्या शरीराला आजारांपासून संरक्षण देणारी नैसर्गिक ढाल म्हणजेच शरीरातील प्रतिकारशक्ती. याचे काम बाहेरून येणाऱ्या जंतूंना ओळखून त्यांचा नाश करणे. पण काही वेळा शरीराची प्रतिकारशक्ती बाहेरील जंतूंऐवजी आपल्याच पेशींना आपले वैरी समजते आणि त्यांच्यावर हल्ला करते, यालाच ऑटोइम्यून रोग किंवा आत्म-प्रतिरक्षा रोग असे म्हणतात. आश्चर्य म्हणजे हे विकार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अनेक पटींनी जास्त आढळतात. स्त्री-शरीरातील हार्मोनल बदल, आनुवंशिक रचना, जीवनशैलीचे घटक आणि प्रतिकारशक्तीची विशेष रचना यांचा एकत्रित परिणाम या प्रकारच्या रोगांच्या वाढीस कारणीभूत ठरतो.

स्त्रियांची प्रतिकारशक्ती का वेगळी? वैज्ञानिक संशोधनानुसार स्त्रियांची स्वयं प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या अधिक तीव्र आणि संवेदनशील असते. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत त्या अनेक संसर्गजन्य आजारांपासून अधिक सुरक्षित राहतात. परंतु हीच अतिसक्रिय प्रतिकारशक्ती काही वेळा शरीरातील निरोगी पेशींवरच हल्ला करू लागते. अशा स्थितीत स्त्रियांची ताकद त्यांच्या समस्या निर्माण करण्याचे कारणही बनू शकते. स्त्री-शरीरातील हार्मोनल बदल हा प्रतिकारशक्तीवर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. किशोरावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्ती या सर्व टप्प्यांमध्ये हार्मोन्सचे मोठे चढउतार होतात. या काळात प्रतिकारशक्तीचे संतुलन सहज बिघडू शकते.

हार्मोन्स आणि आत्म-प्रतिरक्षा रोग : इस्ट्रोजन हा स्त्रियांमधील प्रमुख हॉर्मोन प्रतिकारशक्तीला सक्रिय ठेवतो. यामुळे स्त्रियांमध्ये विविध संसर्गांशी लढण्याची क्षमता अधिक असते. पण जास्त प्रमाणात किंवा अचानक कमी-अधिक झालेल्या इस्ट्रोजनच्या मात्रेमुळे प्रतिकारशक्ती स्वतःच्या पेशींनाच परके मानू लागते. जसे,अनेक महिलांना ल्यूपस आणि र्‍ह्यूमॅटॉइड आर्थ्रायटिसची लक्षणे मासिक पाळीच्या अगोदर किंवा नंतर वाढताना दिसतात. गर्भधारणेनंतर प्रतिकारशक्तीत मोठे बदल होतात. त्यामुळे थायरॉईडचे आत्म-प्रतिरक्षा रोग अनेक स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर सुरू होतात. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन कमी झाल्याने सांधेदुखी, दाह आणि काही ऑटोइम्यून विकार अधिक तीव्र होऊ शकतात.

आनुवंशिकता आणि X गुणसूत्र : स्त्रियांकडे दोन X गुणसूत्रे असतात, तर पुरुषांकडे एकच. प्रतिकारशक्तीशी संबंधित अनेक जीन्स X गुणसूत्रांवर आधारित असल्याने स्त्रियांमध्ये हे विकार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. एखाद्या X गुणसूत्रात दोष असल्यास त्याचा परिणाम प्रतिकारशक्तीच्या कार्यावर होऊ शकतो. शिवाय कुटुंबातील सदस्यांना आत्म-प्रतिरक्षा रोग असल्यास पुढील पिढीतही त्यांचा धोका वाढतो.

जीवनशैली आणि पर्यावरणाचा प्रभाव : आजच्या आधुनिक आणि तणावपूर्ण जीवनशैलीचा प्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होतो. यामध्ये, सततचा मानसिक ताण, अनियमित झोप, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, प्रदूषित वातावरण, रासायनिक पदार्थांचा वापर दिसून येतो.

या सर्वांमुळे प्रतिकारशक्ती गोंधळून अति-संवेदनशील बनते. अनेक महिलांमध्ये कामाचे ओझे, घरातील जबाबदाऱ्या, गर्भधारणा आणि पालकत्वाचा तणाव यामुळे प्रतिकारशक्तीचे संतुलन ढासळते. शरीर थकलेले, अपुरी झोप आणि मानसिक ताण कायम राहिल्यास शरीरातील दाहक प्रतिक्रिया वाढतात.

स्त्रियांमध्ये आढळणारे प्रमुख ऑटोइम्यून रोग 

१) ल्यूपस (एस एल ई- सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमॅटोसस)

हा दीर्घकालीन व बहुअवयवी रोग आहे.

त्वचा, सांधे, मूत्रपिंड, फुफ्फुस, हृदय यांवर परिणाम होतो.

चेहऱ्यावर फुलपाखरासारखा लाल रॅश, थकवा, सांधेदुखी, केस गळणे ही लक्षणे दिसतात. 

२) र्‍‍ह्यूमॅटॉइड आर्थ्रायटिस (आर ए)

हात-पायांच्या सांध्यात वेदना, कडकपणा व सूज येते.

सकाळी उठल्यावर वेदना जास्त जाणवतात.

उपचार न केल्यास सांधे वाकडे होऊ शकतात. 

३) थायरॉईडचे आत्म-प्रतिरक्षा रोग हाशिमोटो थायरॉइडायटिस: 

थायरॉईडची क्रिया मंदावल्यामुळे वजन वाढ, थकवा, थंडी जास्त लागणे आढळते. ग्रेव्ह्स विकार: थायरॉईड अतिसक्रिय झाल्याने वजन घट, हृदयाची धडधड, तापटपणा दिसून येतो. 

४) मल्टिपल स्क्लेरोसिस (एम एस)

मेंदू व मज्जातंतू यांची संरक्षण आवरणे (मायलिन शिथ) खराब होतात.

स्नायूंची ताकद कमी होणे, चालण्यात अडथळा, दृष्टीतील समस्या आढळतात. 

५) सोरायसिस आणि सोरायटिक आर्थ्रायटिस त्वचेवर लाल, खवलेदार चट्टे.

काही रुग्णांमध्ये सांधे सुजणे व दुखणे असते.

ऑटोइम्यून रोगांची लक्षणे

सततचा थकवा

सांधेदुखी किंवा कडकपणा

केसांचे गळणे

त्वचेवर रॅश

वजनात अचानक वाढ/घट

पचनाच्या तक्रारी

हातापायांत मुंग्या येणे किंवा जळजळ

वारंवार ताप येणे ही लक्षणे सातत्याने दिसत असल्यास तपासणी आवश्यक आहे.


उपचार आणि व्यवस्थापन : ऑटोइम्यून रोग कायमचे बरे करता येत नसले तरी लक्षणे मोठ्या प्रमाणात नियंत्रित करता येतात. 

१) औषधोपचार: अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे (दाह कमी करणारी), इम्युनोसप्रेसंट्स (प्रतिकारशक्ती नियंत्रित करणारी), बायोलॉजिकल थेरपी, हार्मोनल उपचार (आवश्यक असल्यास) यामध्ये सुचविले जातात. 

२) जीवनशैलीतील बदल: संतुलित आहार: ओमेगा-३, हरभर्‍यासारखी प्रथिने, भाजीपाला, फळे आहारात ठेवावीत. नियमित व्यायाम: चालणे, योग, हलके स्ट्रेचिंग करावे. पुरेशी झोप व ध्यान, प्राणायाम करून तणाव नियंत्रणाचा प्रयत्न करावा. धूम्रपान व मद्यपान टाळावे. 

३) नियमित वैद्यकीय फॉलो-अप: ऑटोइम्यून रोगांची लक्षणे वेळेनुसार बदलतात. त्यामुळे नियमित तपासणी फार महत्त्वाची असते.

स्त्रियांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती ही अत्यंत सक्षम पण संवेदनशील प्रणाली आहे. तिच्या अतिसक्रियतेमुळे आत्म-प्रतिरक्षा विकार उद्भवतात. हार्मोनल बदल, आनुवंशिकता, पर्यावरण आणि जीवनशैलीचे घटक या विकारांना चालना देतात. योग्य जीवनशैली, लवकर निदान आणि सातत्यपूर्ण उपचारांनी स्त्रिया हे विकार प्रभावीपणे नियंत्रित ठेवू शकतात.

स्वतःच्या शरीरातील बदलांबद्दल जागरूकता आणि वेळीच वैद्यकीय सल्ला हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर