बायणातील दरोड्याबाबत पोलिसांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाली होती माहिती

तिसऱ्या दिवशीही धागेदोरे शोधण्यात पोलिसांना अपयश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
50 mins ago
बायणातील दरोड्याबाबत पोलिसांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाली होती माहिती

वास्को : बायणा येथे घडलेल्या दरोड्याबाबत पोलिसांना ‘गोल्डन अवर’मध्ये (घटनेनंतर एक तासाच्या आत) माहिती मिळाल्याचे समजते. मात्र, तिसऱ्या दिवशीही दरोडेखोरांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. विविध पथके तयार करून तपासाला वेग देण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. तरीदेखील तपासाची प्रगती, हाती लागलेले धागेदोरे याबद्दल पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.

बायणातील मुख्य रस्त्याकडेला असलेल्या चामुंडा आर्केड इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर राहणारे सागर नायक यांच्या फ्लॅटमध्ये दि. १८ रोजी मध्यरात्री दरोडा घालून सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज लुटला. त्यामध्ये सोन्याचांदीचे दागिने व रोकडचा समावेश आहे. दरोडेखोरांनी अतिशय नियोजनबद्धरित्या हा दरोडा घातला. दरोड्यानंतर निघताना सागर नायक, त्यांची पत्नी हर्षा व मुलगी नक्षत्रा यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचे हात बांधून तोंडात कापडी बोळे घातले होते. तथापि, नक्षत्रा हिने कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर त्याच इमारतीमध्ये राहणारे तिचे काका व इतरांना मदतीसाठी बोलाविले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सागर नायक गंभीर जखमी झाल्याने त्यांना इस्पितळात नेण्यात आले. पोलिसांना याबाबत त्वरित माहिती देण्यात आली.

दरोडेखोर इमारतीच्या मागील बाजूने कुंपणावरून आले होते. त्याच वाटेने लुटीनंतर पळाले. त्यांना तेथील सर्व वाटा माहित असल्यासारखे ते निघून गेले. चालत मागील रस्त्यावर आले, तेथून त्यांनी पूर्वीचा बायणा पोलीस चौकीचा रस्ता धरला. त्यानंतर ते बायणा किनाऱ्याकडे गेले असे समजते.

पोलिसांना त्वरित माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नाकाबंदी व इतर गोष्टींचा अवलंब केला. परंतु ते दरोडेखोर अद्याप हाती लागले नाहीत. ते दाबोळी सांकवाळ महामार्गावर गेले असावेत यासाठी त्या मार्गावरील आस्थापने, दुकानांसमोरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांतून काही हाती लागते काय? यासाठी पोलीस कामाला लागले आहेत.

पोलिसांना गोल्डन अवरमध्ये दरोड्याची माहिती मिळाल्याने त्यांना दरोडेखोरांचा मार्ग काढणे सोपे जाणार आहे. तथापि, तीन दिवसांनंतरही कोणता धागादोरा हाती लागला की नाही हे समजण्यास मार्ग नाही. मुरगाव पोलिसांनी भा. दं. सं. २०२३च्या ३३१(३), १०९, ३५१(३), १२६(२), ३१०(२) कलमानुसार तसेच गोवा बाल कायदा २००३ च्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चौकशीसाठी काही जण ताब्यात

सागर नायक हे आईस्क्रिम वितरक असल्याने व त्यांचे चामुंडा मार्केटिंग असल्याने त्यांच्याकडे कामाला असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. काहीजणांना पहिल्या दिवसांपासून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.