सामाजिक संघटनांच्या हरकतीनंतर ‘कामसूत्र कथा’, ख्रिसमस कार्यक्रमावर बंदी

पोलिसांकडून आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
35 mins ago
सामाजिक संघटनांच्या हरकतीनंतर ‘कामसूत्र कथा’, ख्रिसमस कार्यक्रमावर बंदी

पणजी : राज्यातील विविध सामाजिक संघटनांनी हरकती नोंदवल्यानंतर ‘कामसूत्र कथा’ (kamsutra katha) या कार्यक्रमावर पोलिसांनी (police) बंदी घातली. पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली असून सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

गोवा महिला मंच, ‘बायलांचो एकवट’, ‘अर्ज’ आणि ‘कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवा’ या संघटनांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता. हा कार्यक्रम २५ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार होता. भगवान रजनीश फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘गोवा लैंगिक पर्यटनाचे केंद्र बनू शकते’ अशी भीती सामाजिक संस्थांनी व्यक्त केली होती. यामुळे गोव्याच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले. सहभागासाठी २४,९९५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. गोवा महिला मंचाने पर्यटन खात्याकडे हरकतीचे पत्र दिल्यानंतर कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवानेही रविवारी पोलिसांकडे निवेदन सादर केले. त्यानंतर या कार्यक्रमावर अखेर बंदी घालण्यात आली.

हेही वाचा