पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर : मुथुसामीचे शतक; यान्सेनची स्फोटक खेळी

गुवाहाटी : गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ दक्षिण आफ्रिकेने आपल्या नावावर केला आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी करत ४८९ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने बिनबाद ९ धावा केल्या आहेत. सलामी जोडी यशस्वी जैस्वाल (नाबाद ७) आणि केएल राहुल (नाबाद २) खेळपट्टीवर आहेत.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ६ विकेट्स गमावून २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी आणखी ४ विकेट्सच्या मोबदल्यात २४२ धावा जोडल्या. शेवटच्या फलंदाजांनी केलेल्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला ४८९ धावांपर्यंत मजल मारता आली.
मुथुसामी-यान्सेनची निर्णायक भागीदारी
मूळ भारतीय वंशाचा असलेला फलंदाज सुनेरन मुथुसामी याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक भारताविरुद्ध झळकावले. त्याने २०६ चेंडूंत १०९ धावांची शानदार खेळी केली. मार्को यान्सेन याने कसोटीत वनडे स्टाईल फलंदाजी करत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची विस्फोटक खेळी केली. मुथुसामी सातव्या स्थानी फलंदाजीला आला. त्याने सातव्या विकेटसाठी कायले वेरेन (४५ धावा) याच्यासह ८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मुथुसामी आणि यान्सेन यांनी आठव्या विकेटसाठी ९७ धावांची निर्णायक भागीदारी करत संघाला ४०० पार पोहोचवले.
टॉप ऑर्डरमधील योगदान
त्याआधी टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. एडन मार्कराम (३८ धावा) आणि रायन रिकेल्टन (३५ धावा) यांनी ८२ धावांची सलामी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. ट्रिस्टन स्टब्सचे अर्धशतक अवघ्या १ धावेने हुकले (४९ धावा). त्याने कर्णधार टेम्बा बावुमा (४१ धावा) याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.
पहिल्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांना यश
टीम इंडियासाठी पहिल्या डावात एकूण १० विकेट्सपैकी ६ विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक ४ बळी घेतले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने २ विकेट्स मिळवल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

यान्सेनची मोठ्या विक्रमाला गवसणी
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सेन याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ९३ धावांची वादळी खेळी करताना एक मोठा विक्रम मोडून काढला आहे. यान्सेनने आपल्या खेळीत ७ गगनचुंबी षटकार मारले आणि तो भारतात भारतीय संघाविरुद्ध फलंदाजी करताना एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विव्ह रिचर्ड्स यांच्या नावावर होता. त्यांनी १९७४ मध्ये दिल्ली कसोटीत ६ षटकार मारले होते. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन याच्या नावावरही २०११ मध्ये चेन्नई कसोटीत एकाच डावात ६ षटकार मारण्याची नोंद आहे.
.........
भारताविरुद्ध एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
मार्को यान्सन – ७ षटकार
विव्ह रिचर्ड्स – ६ षटकार
मॅथ्यू हेडन – ६ षटकार
इयान बॉथम – ५ षटकार
इम्रान खान – ५ षटकार