रणजी चषक : पार्थ भूतचे ५६ धावांत ७ बळी

पणजी : रणजी ट्रॉफी एलिट ‘ब’ गटातील आपल्या पाचव्या सामन्यात गोवा संघाला सौराष्ट्रकडून एक डाव व ४७ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. वडोदरा येथील निरंजन शहा स्टेडियम ग्राऊंड ‘सी’ येथे हा सामना झाला. सौराष्ट्रच्या पहिल्या डावातील ७ बाद ५८५ (घोषित) या धावसंख्येला उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव १०६.२ षटकांत ३५८ धावांत संपला होता. यानंतर गोवा संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती.
दुसर्या डावात गोव्याची फलंदाजी खालावली. त्यामुळे सौराष्ट्रला पुन्हा फलंदाजीला उतरवणे त्यांना शक्य झाले नाही. गोव्याचा दुसरा डाव बुधवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी १८० धावांत संपला. गोवा संघाकडून दुसर्या डावात सलामीवीर मंथन खुटकर (३६) व अभिनव तेजराणा (३४) यांनीच थोडीफार चमक दाखवली. सौराष्ट्रकडून पार्थ भूत याने ५६ धावांत ७ गडी बाद केले. पाच सामन्यांनंतर गोव्याचा संघ १ विजय, २ पराभव व २ अनिर्णित अशा निकालांसह ११ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. गोव्याचा पुढील सामना २२ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत होणार आहे. पुणे येथील डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राऊंड येथे महाराष्ट्र संघाशी गोवा दोन हात करणार आहे.
गोव्याचा अभिनव तेजराणा अव्वल
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर गोव्याचा अभिनव तेजराणा हा सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ५ सामन्यांतून ९३.००च्या सरासरीने त्याने ६५१ धावा केल्या आहेत. यात ३ शतके व २ अर्धशतकांचा समावेश आहे. दिल्लीचा सनत सांगवान ६२७ धावांसह दुसर्या तर करुण नायर ६०२ धावांसह तिसर्या स्थानी आहे.