भारताचा अर्जुन एरिगेसी-वेई यी यांच्यात टायब्रेकर

फिडे विश्वचषक : तीन क्वार्टर फायनल लढती ड्रॉ

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th November, 11:47 pm
भारताचा अर्जुन एरिगेसी-वेई यी यांच्यात टायब्रेकर

पणजी : येथे सुरू असलेल्या फिडे विश्वचषक २०२५ बुद्धिबळ स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी आणि चीनचे ग्रँडमास्टर वेई यी यांच्यातील लढत टायब्रेकरमध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या गेममध्ये मधल्या टप्प्यात (मिडल गेम) मिळालेली आघाडी अर्जुन एरिगेसीला निर्णायक विजयात बदलता आली नाही आणि त्याला ड्रॉवर समाधान मानावे लागले.
अर्जुनचा उत्कृष्ट प्रयत्न
सोमवारी काळ्या मोहऱ्यांनी जलद ड्रॉ खेळल्यानंतर, अर्जुन एरिगेसी पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना विजयासाठी आशावादी होता. स्पर्धेतील सर्वाधिक मानांकित खेळाडू असलेल्या अर्जुनने मधल्या गेममध्ये चांगली आघाडी मिळवली होती.
त्यावेळी, बुद्धिबळाच्या तज्ज्ञांकडून अर्जुनला निर्णायक आघाडी घेण्यासाठी ‘बिशप’चा बळी देण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, अर्जुनने त्याऐवजी अधिक स्थिर क्वीनसह डी२ वर चाल खेळली. त्यानंतर वेई यीने चांगला बचाव करत अर्जुनला अधिक फायदा मिळवण्यापासून रोखले, ज्यामुळे गेम ड्रॉ झाला आणि लढत टायब्रेकरमध्ये गेली.
अर्जुन आता बुधवारी टायब्रेकरची सुरुवात काळ्या मोहऱ्यांनी करेल आणि तो 'रॅपिड फॉरमॅट'मध्ये (जलद बुद्धिबळात) पुढे जाण्यासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे.
अर्जुन एरिगैसी आणि वेई यी यांच्याव्यतिरिक्त आणखी दोन क्वार्टर फायनल लढती टायब्रेकरमध्ये पोहोचल्या आहेत. ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेंको आणि ग्रँडमास्टर सॅम शँकलँड यांच्यात ३७ चालींनंतर गुण विभागले गेले (ड्रॉ). तर ग्रँडमास्टर जोस एडुआर्डो मार्टिनेज अल्कांतारा आणि ग्रँडमास्टर जावोखिर सिंडारोव यांच्यातील सामना केवळ २५ चालींनंतर, म्हणजेच अवघ्या १८ मिनिटांत ड्रॉ झाला.


नोडिरबेक याकूबबोव उपांत्य फेरीत

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोडिरबेक याकूबबोव हा दोन क्लासिकल गेम्सनंतर उपांत्य फेरीत पोहोचणारा एकमेव खेळाडू ठरला. त्याने जर्मनीच्या ग्रँडमास्टर अलेक्झांडर डोनचेंको विरुद्धचा दुसरा गेम ५७ चालींमध्ये ड्रॉ केला. याकूबबोवने पहिला गेम पांढऱ्या मोहऱ्यांनी जिंकला होता.

सामन्यांचे निकाल (एकूण गुण)
आंद्रे एसिपेंको वि. सॅम शँकलँड : १:१
जोस एडुआर्डो मार्टिनेज अल्कांतारा वि. जावोखिर सिंडारोव १:१
अर्जुन एरिगसी वि. वेई यी १:१
अलेक्झांडर डोनचेंको वि. नोदिरबेक याकुबोव : ०.५:१.५ (याकुबोव विजयी)