खासदार अनुरागसिंह ठाकूर : फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेला लावली विशेष उपस्थिती

पणजी : भारताची मोठी लोकसंख्या आणि देशात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा विचार केल्यास, २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारतालाच मिळायला हवे, असा विश्वास माजी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि खासदार अनुरागसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी भारत ऑलिम्पिक आयोजनासाठीची अधिकृत बोली सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.
हडफडे येथे सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील फिडे विश्वचषक २०२५ बुद्धिबळ स्पर्धेला त्यांनी विशेष उपस्थिती लावली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. १.४ अब्ज लोकसंख्या असलेला भारत सध्या जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच तो तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. क्रीडा क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्येही नव्या सुविधा विकसित होत आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना पुढील वर्षी २०२४ मध्ये २०३६ ऑलिम्पिकसाठी बोली सादर करेल आणि भारताला यजमानपद मिळेल, असे ठाकूर म्हणाले.
क्रीडा खात्यासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद ८६ कोटींवरून ३४०० कोटींपर्यंत पोहोचली आहे, तर क्रीडा क्षेत्रावरील खर्च ६०० कोटींवरून ३ हजार कोटींवर गेला आहे. देशात १,१०० 'खेलो इंडिया' केंद्रे असून, सरकारचे योग्य धोरण आणि खर्चामुळे सर्व खेळांमध्ये नवीन खेळाडू तयार होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, फिडे विश्वचषक आयोजन ऐतिहासिक आहे, कारण आपण २० वर्षांनंतर विश्वचषक आयोजित करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ट्रॉफीला भारतीय बुद्धिबळ दिग्गज विश्वनाथन आनंद यांचे नाव देण्यात आले आहे. ही केवळ येणाऱ्या दशकांची नाही, तर येणाऱ्या शतकांची ट्रॉफी आहे.
भारताची जागतिक स्तरावर झेप
ठाकूर यांनी स्पष्ट केले की, आनंद यांनी तीन दशकांहून अधिक काळ भारतीय बुद्धिबळाचे नेतृत्व केले. आता डी गुकेशने २०२४ मध्ये विश्वविजेतेपदाचा किताब जिंकून आनंद यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहेत.
गोवा जागतिक आयोजनाचे केंद्र
अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितले की, गोवा हे भारतात जागतिक आयोजनांसाठी एक मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक असो वा चित्रपट महोत्सव, गोवा यशस्वी आयोजनातून आपली छाप सोडत आहे.
एआयसीएफची विकासात्मक भूमिका
ठाकूर यांनी अध्यक्ष नितीन नारंग यांच्या नेतृत्वाखालील एआयसीएफच्या कार्याचा गौरव केला. देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे आणि खेळाडूंना वार्षिक अनुदान देणे, हा गेल्या दोन वर्षांत एआयसीएफने उचललेला सर्वात मोठा आणि प्रशंसनीय निर्णय आहे, असे ते म्हणाले.