दृष्टिहीन महिला संघाने टी-२० विश्वचषकावर कोरले नाव

कोलंबो : महिला टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांनी भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. भारतीय दृष्टीहीन महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. वूमन्स इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळचा ७ विकेट्सने धुव्वा उडवत वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवली.
भारतीय संघाने या स्पर्धेत जशी सुरुवात केली होती तसाच शेवटही केला. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. भारताच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंचं अभिनंदन केले जात आहे. पी. सारा ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारत महिला संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळला २० षटकांत ५ गडी गमावून फक्त ११४ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी नेपाळच्या फलंदाजांना संपूर्ण फलंदाजीदरम्यान केवळ एकच चौकार मारण्याची संधी दिली. त्यानंतर भारतीय महिला संघाने १२ षटकांत केवळ ३ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले.
महाअंतिम सामन्यातील नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधाराने नेपाळला फलंदाजीसाठी भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. भारतीय गोलंदाजांनी नेपाळला ६ च्या रनरेटनेही धावा करू दिल्या नाहीत. भारताने नेपाळला २० षटकांत ५ झटके देत ११४ धावांवर रोखले. नेपाळसाठी सरिता घिमिरे आणि बिमला राय या दोघींनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. सरिताने ३५ तर बिमलाने २६ धावांचे योगदान दिले. या दोघींव्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियासाठी जमुनी राणी टुडू आणि अनु कुमारी या दोघींनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
त्यानंतर भारताने ११५ धावांचे आव्हान सहज पूर्ण करत एकतर्फी विजय मिळवला. भारताने हे आव्हान ४७ चेंडू आणि ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताने १२.१ षटकांमध्येच विजय साकारला. भारताला विजयी करण्यात फुला सरेन आणि करुणा के या दोघींनी फलंदाजीत प्रमुख योगदान दिले. फुलाने २७ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. तर करुणा के हीने २७ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. तसेच बसंती हांसदा हीने नाबाद १३ धावा करत भारताला वर्ल्ड कप ट्रॉफीपर्यंत पोहचवण्यात मदत केली.
भारताचा सलग सातवा विजय
टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. भारताने या स्पर्धेतील एकही क्रिकेट सामना गमावला नाही. या स्पर्धेत एकाही संघाला भारताला पराभूत करता आले नाही. भारताने श्रीलंकेचा १० विकेट्सने धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर भारताने कांगारूंवर २०० पेक्षा अधिक धावांच्या फरकाने मात केली. भारताने ऑस्ट्रेलियावर २०९ धावांनी विजय साकारला.