हणजूण जमीन हडप प्रकरणी मोहम्मद सुहैलला सशर्त जामीन

अन्य एका प्रकरणात जामीन न मिळाल्यामुळे न्यायालयीत कोठडीतच मुक्काम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd November, 11:58 pm
हणजूण जमीन हडप प्रकरणी मोहम्मद सुहैलला सशर्त जामीन

पणजी : हणजूण येथील जमीन हडप (Land grabbing) प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल (Mohammad Suhail) उर्फ मायकल फर्नांडिस याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ४० हजार रुपये हमी व अटींसह सशर्त जामीन मंजूर केला. या संदर्भातील आदेश न्या. सुमन गाड यांनी दिला. मात्र, ईडीशी संबंधित अन्य एका प्रकरणात जामीन न मिळाल्याने सुहैलचा न्यायालयीन कोठडीतच मुक्काम राहणार आहे.

गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाने (SIT) एलिटेरियो अँथनी कार्वाल्हो यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, तक्रारदाराच्या पूर्वजांची आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ४४/२ येथील २,४५० चौ. मीटर जमीन आहे. ही जमीन बनावट दस्तावेजांद्वारे संशयित ब्रांका दिनिज, पावलिना दिनिज, मारियानो गोन्साल्विस आणि राॅयसन रॉड्रिग्ज, मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस, राजकुमार मैथी, डॅनवर डिसोझा आणि इतरांनी हडप केल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन तत्कालीन एसआयटीचे निरीक्षक सूरज सामंत यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये संशयित राॅयसन रॉड्रिग्ज या संशयिताला एसआयटीने अटक करून कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सनीत कवळेकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला अटक केली. संशयित सुहैलला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली. याच दरम्यान सुहैल याने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली.

सध्या संशयित न्यायालयीन कोठडीत अाहे. या प्रकरणातील सहसंशयित राॅयसन रॉड्रिग्ज याला यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले आहे, असा युक्तिवाद संशयितातर्फे अॅड. रितेश रावळ यांनी मांडला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित सुहैलला ४० हजार रुपयांच्या हमीवर, पुढील १५ दिवस सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावणे तसेच इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.

जामीन मिळाल्यास फरार होण्याची शक्यता!

संशयित जमीन हडप प्रकरणाच्या सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार अाहे. त्याच्याकडून बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करायचे असून, त्याला जामीन मिळाल्यास तो पुरावे नष्ट करू शकतो. तो साक्षीदारांवर दबाव टाकणार तसेच तो फरार होऊ शकतो, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. 

हेही वाचा