बटाटा, कांदा ५० रुपयांवर, कैऱ्या दाखल.

पणजी: यंदा महाराष्ट्र तसेच कर्नाटकमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे तेथून होणारी भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी, पणजी बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. सोमवारी बाजारात टोमॅटोचे दर वाढून ८० रुपये किलो झाले. यासोबतच हंगामाच्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात स्थानिक कैऱ्या १०० रुपयांना चार नग तर तोतापुरी कैऱ्या १२० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. पुढील काही दिवस भाज्यांचे दर चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाजारात बटाटा आणि कांद्याचे दर १० रुपयांनी वाढून प्रत्येकी ५० रुपये किलो झाले आहेत. वालपापडीचे दर वाढून १२० रुपये किलो झाले, तर ढब्बू मिरची २० रुपयांनी महाग होऊन १२० रुपये किलोवर पोहोचली. कोबी आणि फ्लॉवरचे दर प्रत्येकी १० रुपयांनी वाढून अनुक्रमे ५० रुपये आणि ६० रुपये किलो झाले. भेंडी, दोडका, गाजर आणि गवार हे प्रत्येकी ८० रुपये किलो दराने विकले जात होते. लहान वांगी ६० रुपये, तर मोठी वांगी ८० रुपये किलो होती. मिरची दर्जानुसार ८० ते १०० रुपये किलो दराने उपलब्ध होती.

सोमवारी पणजी बाजारात आले २० रुपयांनी वाढून १६० रुपये किलो झाले, तर लसूण दर्जानुसार ३०० ते ३५० रुपये किलो होता. दुधी भोपळा ५० रुपये नग दराने विकला जात होता, तर शेवगा २० रुपयांनी वाढून १६० रुपये किलोवर पोहोचला. बाजारात काही व्यापाऱ्यांकडे मटार उपलब्ध झाले असून, त्याची किंमत २०० रुपये किलो आहे.भाजीपाल्यात, मेथी तसेच शेपूची २५ रुपये प्रती जुडी अशी किमत होती. पालक १५ रुपये, तर कोथिंबीर २० रुपये जुडी होती. लिंबू ५० रुपयांना १५ नग दराने विकले जात होते. सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी ६१ रुपये, कोबी ३६ रुपये, फ्लॉवर ४५ रुपये (एक नग), गाजर ६६ रुपये, वालपापडी ६० रुपये, मिरची ५५ रुपये, कांदा २८ रुपये, बटाटा ३१ रुपये, तर टोमॅटो ५३ रुपये किलो दराने उपलब्ध होता.

लहान नारळ ३० रुपये नग
मागील काही दिवसांत बाजारात लहान नारळाची किंमत ४० रुपये होती. सोमवारी हे दर कमी होऊन ३० रुपये झाले. तर मध्यम आणि मोठ्या आकाराचे नारळ ४० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होते.
![]()